
नागपूर : शहरातील अभ्यंकर नगर चौक – बजाज नगर चौक – काचीपुरा चौक या मार्गावर नागपूर महानगरपालिकाने सुमारे २० कोटी रुपये खर्च करून विकसित केलेली ‘वॉकेबल स्ट्रीट’ आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हीच स्ट्रीट आता ‘ड्रग्स स्ट्रीट’ म्हणून ओळखली जाऊ लागली असून, येथे बेकायदेशीर कृत्यांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज महाराष्ट्र विधानसभात हा गंभीर मुद्दा ठामपणे उपस्थित केला. सार्वजनिक पैशातून उभारलेला हा प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असताना, त्याच ठिकाणी बेकायदेशीर हालचाली सुरू असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्पष्ट इशारा दिला. संबंधित परिसरातील बेकायदेशीर कृत्यांवर तात्काळ आळा घालण्यात अपयश आल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना थेट जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाकडून तातडीने ठोस कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.








