Published On : Tue, Jul 17th, 2018

उठ भगिनी जागी हो, लघुउद्योगाचा धागा हो!

नागपूर : ‘उठ भगिनी जागी हो, लघुउद्योगाचा धागा हो’ असा मंत्र देत नागपूर शहरातील बचत गटांच्या महिलांना लघुउद्योगाच्या माध्यमातून प्रगती साधण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी केले.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाकडे वळविण्याच्या दृष्टीने ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला सुरुवात झाली. याअंतर्गत हनुमान नगर झोनमधील महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता मानेवाडा मार्गावरील मार्कंडेय सभागृहात मंगळवारी (ता. १७) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकूर, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मंगला खेकरे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, कल्पना कुंभलकर, मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, स्त्री संसार उत्तम सांभाळते. त्यामुळे व्यवस्थापन हा गुण उपजतच तिच्या अंगी असतो. कुठल्याही गोष्टीचे सुयोग्य व्यवस्थापन ती उत्तमरीत्या करू शकते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सामूहिकरीत्या अथवा वैयक्तिक उद्योग महिलांनी सुरू केला तर त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांची त्यांना माहिती व्हावी, त्याचा लाभ कसा घ्यायचा त्याचे तंत्र माहिती व्हावे, बँकांकडून अर्थसहाय्य मिळविण्यासाठी काय करता येईल, या संपूर्ण बाबीची माहिती एकाच छताखाली व्हावी, याकरिताच सदर अभियानाचे झोननिहाय आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी या अभियानाचा लाभ स्वत:करिता करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नगरसेविका विशाखा बांते यांनी यावेळी महिलांना रेशन कार्डचा उपयोग आणि त्यामाध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळतो, त्यासाठी महिलांनी काय करायला हवे, याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना लघु उद्योगाच्या कुठल्याकुठल्या संधी आहेत, याबाबत संबंधित क्षेत्रातील साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता समुदाय संघटक नीता गोतमारे, योगेश्वर डांगे, कविता खोब्रागडे, संगीता मोटघरे, शशी फुलझेले, सुनंदा रामटेककर, चंद्रकांता गायधने, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

विविध प्रशिक्षण संस्थांनी दिली माहिती
‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम स्थळी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना जे मोफत प्रशिक्षण देण्यात येते, त्याची माहिती देणाऱ्या विविध संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. डाटा-टेक, सिगमा, समाधान, लावण्य या विविध संस्थांच्या स्टॉल्सला महिलांनी भेटी देऊन प्रशिक्षणाबद्दल माहिती घेतली.

५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प
महिलांच्या उन्नतीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘चलो चले प्रगति की ओर’ या अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी उद्युक्त करण्याचा उद्देश आहे. या माध्यमातून सुमारे ५०० वर महिलांना रोजगार देण्याचा संकल्प मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आला.