
नागपूर : वाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या तीन दिवसांत घरफोडी प्रकरणातील तिन्ही आरोपींना गजाआड करत तब्बल ७ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या यशस्वी कारवाईत सोन्या–चांदीचे दागिने, दोन दुचाकी, एक चारचाकी आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
चोरीची घटना-
१ ऑगस्ट २०२४ रोजी वाडी परिसरातील खडगाव रोडलगत असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, रोकड व वाहनांसह मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू झाला. तांत्रिक माहिती व सायबर तपासाच्या आधारे केवळ दोन दिवसांत संशयितांचा शोध लागला.
अटक आरोपी-
- शेख अल्ताफ शेख आरीफ (२४), रा. माजरी, यशोधरानगर, नागपूर
- नावेद उर्फ दानीश अयुब शाह (२५), मूळ रा. अकोला, सध्या वंदेवी नगर, कळमणा, नागपूर
- इमरान उर्फ राजा (धांदल) अल्ताफ खान (२७), रा. गोरेवाडा, मानकापूर, नागपूर
जप्त मुद्देमाल-
पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये—
- सोन्याचे २३ नग दागिने – वजन ११६.२१ ग्रॅम, किंमत ₹७,०७,४१९
- चांदीचे २३ नग दागिने – वजन ३४४.८६ ग्रॅम, किंमत ₹३४,७१८
- बेंटेकचे ४ दागिने – किंमत ₹१००
- दोन दुचाकी – किंमत सुमारे ₹२.९ लाख
- एक होंडा बिझो चारचाकी – किंमत ₹२ लाख
- ओप्पो मोबाईल – किंमत ₹५,०००
एकूण मुद्देमालाची किंमत ₹७,४२,२३७ इतकी आहे.
पोलिस पथकाचे योगदान-
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहायक पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, पोलीस उपायुक्त ऋषीकेश रेड्डी आणि एमआयडीसी विभागाचे श्री. सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, उपनिरीक्षक अमित बंडगर, तसेच हवालदार, नापोशी व सायबर तज्ञ अशा एकूण नऊ जणांच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
पोलिसांचे आवाहन-
नागरिकांनी घराबाहेर जाताना सीसीटीव्ही लावणे, ग्रील लॉकचा वापर करणे, शेजाऱ्यांना माहिती देणे अशा खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.