Published On : Sat, Jan 15th, 2022

वि. सा. संघाचा इतिहास गौरवशाली व प्रेरणादायी : ना. नितीन गडकरी

99 वा वर्धापन दिन महोत्सव

नागपूर: विदर्भ साहित्य संघाचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवशाली आणि प्रेरणादायी आहे. हा इतिहास अधिक प्रबळ व्हावा. तसेच वि.सा. संघ ही चळवळ अजून लोकाभिमुख व्हावी आणि त्यातून समाजात जागरुकता निर्माण व्हावी. वि.सा. संघ हा फक्त नागपूरपुरता मर्यादित नाही, तर संघाच्या शेकडो शाखा निर्माण झाल्या आहेत. पण ही चळवळ अधिक विशाल व गतिशील आणि सर्वव्यापी व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Advertisement

विदर्भ साहित्य संघाचा आज 99 वा वर्धापन दिन महोत्सव साजरा होत आहेत. त्या आभासी समारोहात ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, मनोहर म्हैसाळकर, डॉ. पिनाक दंदे, डॉ. उषा किरण देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- वि. सा.संघाचा 100 वर्षाचा इतिहास विदर्भातील साहित्यिक चळवळीला दिशा देणारा आहे. ग. त्र्यं. माडखोलकर, राम शेवाळकर यांच्यासारख्या थोर साहित्यिकांनी वि. सा.संघाला अतिशय योग्य मार्गदर्शन केले. तसेच डॉ. मनोहर म्हैसाळकर यांनीही वि.सा.संघाचे यशस्वी नेतृत्व केले. विद्वान आणि साहित्यिक यांना योग्य सांभाळणे कठीण काम असते. पण डॉ. म्हैसाळकरांनी ते यशस्वी केले व सर्वांना सांभाळले.

साहित्य संघाची चळवळ ही विदर्भासाठी अभिमानाचा विषय असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- 99 व्या वर्धापन दिनाची घटना ही ऐतिहासिक आहे. विदर्भात थोर साहित्यिकांची एक मोठी मालिका आहे. या सर्वांनी मराठी साहित्य आणि मराठी सारस्वताची सेवा केली आहे. या सर्वांचे कार्य खूप मोठे आहे. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे हे साहित्यिक होते. प्राचार्य राम शेवाळकरांचे व्यक्तिमत्त्व आजही विसरू शकणार नाही असेच होते. ज्ञानेश्वरी, पसायदान, मराठी
साहित्यावरील त्यांचे प्रभुत्व आजही स्मरणात आहे. या सर्व थोर साहित्यिकांनी विदर्भातील राजकारण आणि समाजकारण तसेच तरुण पिढीला प्रभावीत केले.

प्राचार्य राम शेवाळकर यांचे एक स्मारक अंबाझरी रोडवर व्हावे अशी इच्छा व्यक्त करताना ना. गडकरी म्हणाले- या स्मारकासाठी नासुप्र जागा देऊन बांधून देण्यास तयार आहे. या स्मारकासोबतच तेथे मराठीची ई लायब्ररी व्हावी व तरुणांमध्ये व भविष्यातील नेत्यांमध्ये वक्तृत्व विकसित करण्यासाठी प्रशिक्षण संस्था रामभाऊंच्या नावाने सुरु व्हावी. तंत्रज्ञानाचा उपयोग करून साहित्यक्षेत्रातही आता बदल व्हावेत, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- राजकारण्यांनी साहित्यिकांच्या कार्यात लुडबूड करू नये असे मला वाटते. पण साहित्यातून प्रेरणा ज्यांना मिळणार आहे, त्यात राजकारणी व समाजकारणीही आहेत.

गुणात्मक परिवर्तन करायचे असेल, समाजातही सेवाभावी समाजव्रती निर्माण करायच्या असतील तर भूतकाळातील जे साहित्य आहे, इतिहास, संस्कृती, परंपरा याचाच वारसा घेऊन नवीन पिढी निर्माण होणार आहे. त्यामुळे साहित्यिकांचा प्रत्येक क्षेत्राशी संबंध आहे. म्हणून साहित्यिकाची दृष्टी ही समाज आणि राष्ट्र घडविणारी आहे. प्रबोधन, प्रशिक्षण व लोकसंस्कार या तीनही गोष्टी साहित्याशी संबंधित आहेत. भविष्यकाळात या चळवळीचे स्वरूप समाजपरिवर्तन व राष्ट्र निर्माणासाठी होईल असा विश्वासही ना. गडकरींनी व्यक्त केला.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement