Published On : Thu, Mar 14th, 2019

मतदारांसाठी विविध डिजिटल सुविधा

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांची सुविधा आणि निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग यावेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करणार आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी सी व्हिजिल (cVigil) हे नवे मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन तक्रार करता येईल.

असे वापरा ‘सी व्हीजिल’
सी व्हीजिल ॲपचा वापर निवडणूक अधिसूचनेच्या तारखेपासून मतदानाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत केला जाऊ शकतो. तक्रारीचे छायाचित्र अथवा व्हीडिओ पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येईल. सिटिजन व्हिजिलन्स अंतर्गत सुरु करण्यात आलेले हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र ठरेल.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडिओ या अॅपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाइलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल.

अॅप वापरकर्त्यास सी व्हिजिल अॅपद्वारे आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मोबाइल नंबर आणि इतर व्यक्तिगत तपशील ॲप प्रणालीवर पाठवले जात नाहीत. त्यामुळे निनावी तक्रारीच्या बाबतीत तक्रारकर्त्यास पुढील संदेश मिळत नाहीत. मात्र त्याच्या तक्रारीवर कारवाई केली जाते.

तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होईल. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक,उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाइल ॲपवर तक्रार करता येईल.

दिव्यांगांसाठी ॲप
दिव्यांगांची मदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हील चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी PWD हे ॲप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ही दोन्ही मोबाईल ॲप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

याशिवाय नागरिकांनी तक्रारी नोंदविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://eci.nic.in या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. 1800111950 तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

Advertisement
Advertisement