Published On : Thu, Mar 14th, 2019

आंतरराज्य सीमेवर निवडणुकीच्या काळात तपासणी पथके तैनात -अश्विन मुदगल

नागपूर: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर संयुक्त तपासणी पथके सज्ज करण्यात आली असून अवैधपणे वाहतूक, दारु तसेच तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. येत्या 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी दोन्ही राज्याच्या सीमा सिल करण्यात येईल. प्रत्येक वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाके सुरु करण्यासंदर्भात छिंदवाडा येथील जिल्हाधिकारी श्रीनिवास शर्मा, मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक जी. के. पाठक तसेच अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झडके, छिंदवाड्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज राय यांची संयुक्त बैठक संसर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नागपूर व अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला.

नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात येत्या 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सीमावर्ती राज्यातून होणारी अवैध वाहतूक तसेच मतदानापूर्वी अवैधपणे होणारी दारु, पैसा तसेच असामाजिक तत्त्वांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात कायमस्वरुपी तपासणी पथके तैनात ठेवण्यासोबतच दोन्ही राज्याच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. दोन्ही राज्यातील सीमेवरील तपासणी नाक्यावर 24 तास तपासणीसाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. हा बंदोबस्त निवडणूकपूर्वी म्हणजे दिनांक 8 ते 11 एप्रिलपर्यंत ठेवण्यात येईल. त्यानंतर छिंदवाडा जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानापर्यंत कायम ठेवण्याबाबतही दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये संमती झाली आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात असामाजिक तत्त्वाविरुद्ध कठोर कारवाई करणे तसेच तडीपार व आवश्यक असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध दोन्ही जिल्ह्यातील अधिकारी परस्पर समन्वयाने संयुक्त कारवाई करतील. अवैधपणे दारुची निर्मिती व वाहतूक पूर्णपणे थांबविण्यासाठी संयुक्त तपासणी करण्यात येईल. तसेच वन विभागातून जाणाऱ्या रस्त्यांवरही पेट्रोलिंग वाढविण्यात येईल. आंतरराज्य चेकपोस्टवर पोलिस विभाग तसेच उत्पादन शुल्क विभागातर्फे तपासणी करण्यात येवून मतदानाच्या दिवशी सीमा सिल करण्यात येईल. असाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

सावनेर तालुक्यात केळवद, चिरोंजी, खुर्सापार येथे 24 तास पेट्रोलिंग तसेच प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येईल. रामटेक तालुक्यातील कोलितमारा, मानेगाव टेक (जबलपूर), भंडारबोडी (भंडारा) येथे तर काटोल तालुक्यातील उमरीकला, राजुरा, लांगा-करवार-पिंपळाकोठा व वडचीटोली (चौरखवरी) येथे तपासणी पथके तैनात राहणार आहेत. दोन्ही राज्यातील अधिकारी अवैध वाहतूक तसेच तपासणीसाठी समन्वयाने काम करणार असल्यचेही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

यावेळी छिंदवाडा येथील अपर जिल्हाधिकारी श्रीमती कविता बादला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशांक गर्ग, रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, सावनेरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, अमरावती विभागाचे श्रीकांत तरवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनीही अमरावती तसेच नागपूर जिल्ह्यातील आंतरराज्य सीमेवर तपासणी पथके तयार करुन सर्व वाहनांची या काळात तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.