नागपूर : शहरात डेंग्यूचे थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांच्या मनात डेंग्यूविषयी प्रचंड भीती असून जनजागृतीचा अभाव आहे. महानगरपालिकेद्वारे झोनस्तरावर कर्मचारी वाढवूनही प्रत्येक घरी जाऊन जनजागृती करणे शक्य होत नाही. अशातच शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन डेंग्यूच्या या लढ्यात नागपूर महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी केले.
मंगळवारी (ता. २३) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये डेंग्यूसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरावार, सदस्या विशाखा बांते, गार्गी चोपरा, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजय जोशी, डॉ. नरेंद्र बहिरवार, मलेरिया व फायलेरिया अधिकारी जयश्री थोटे, कनक रिसोर्सेस ॲण्ड मॅनेजमेंटचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सभापती मनोज चापले यांनी दहाही झोनची डेंग्यूसंदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली. तसेच महानगरपालिकेतर्फे डेंग्यूसंदर्भात नियुक्त कर्मचा-यांच्या कामाचाही आढावा घेतला. नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे डेंग्यूसंदर्भात लोकांपर्यंत माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. जनजागृतीमधूनच डेंग्यूवर मात करता येऊ शकते, असेही सभापती मनोज चापले म्हणाले. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे. पथनाट्य व इतर माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. याशिवाय शहरातील आशा कर्मचा-यांनाही यामध्ये सहभागी करण्यात यावे. प्रत्येक प्रभागामध्ये कार्यरत आशा कर्मचा-यांना संपूर्ण परिसराची माहिती असते त्यांच्यामार्फत जनजागृती करणारे पत्रक वितरीत करण्यात यावेत, असेही सभापती मनोज चापले म्हणाले.
स्वच्छ भारत मिशन संदर्भात नगरसेवकांची बैठक बोलवा
स्वच्छ भारत मिशन संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यासाठी व त्यामध्ये काय सुधारणा करता येतील या सूचनांसह सहकार्यासाठी झोनस्तरावर नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात यावी. या संदर्भात झोन सभापतींना पत्र देण्यात यावे, असे निर्देशही सभापती मनोज चापले यांनी दिले. प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात ओला व सुका कचरा कशाप्रकारे विलग करायचा याबाबत माहिती देणारे स्टीकर्स चिकटविण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.
