Published On : Wed, Mar 21st, 2018

वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी विटावा – कोपरीदरम्यान खाडीपूल उभारावा : आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी


मुंबई: येथून नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, नाशिक, विरार, अहमदाबाद येथे अनेक हलकी जड वाहने जात असतात त्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून ठाणे-बेलापूर मार्गावर विटावा ते कोपरीदरम्यान खाडीपूल उभारण्यात यावा अशी मागणी लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात केली.

कळवा नाका ते आत्माराम पाटील चौक रेतीबंदर येथील रस्त्याचेही रुंदीकरण व्हावे व सर्व्हिस रोड प्रकल्पही मार्गी लावण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची एमएमआरडीए तसेच शासनस्तरावर अनेक बैठका होवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ५ ते १० मिनिटाच्या प्रवासासाठी ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागत आहे याकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले. सरकारने याप्रकरणी वेळीच हस्तक्षेप करुन सुरळीत दळणवळण व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरीत उपाययोजना करावी अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षवेधीवर अधिवेशन संपण्याअगोदर मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक लावण्यात येईल आणि योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन संबंधित मंत्र्यांनी दिले.