Published On : Sat, Sep 22nd, 2018

विश्वशांती मानव सेवाश्रम अधीनस्थ मंदिराच्या निधीचा घोळ

Advertisement

नागपूर: सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून मंदिराला दानस्वरूपात मिळालेल्या निधीचा अध्यक्षाकडून गैरवापर होत असल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. मानेवाडा रोडवरील, बालाजी नगर येथील विश्वशांती मानव सेवाश्रमाअंतर्गत स्थापित श्री संत गजानन मंदिरात हा मनमानी कारभार सुरू असून, अध्यक्ष आणि व्यवस्थापकाविरोधात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

नागपूर येथील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेनुसार, अर्जदार पांडुरंग ज्ञानदेव कहिले (वय ६८) आणि जनार्दन दामूजी चिखलकर (वय ६५) यांनी स्पष्ट केले की, विश्वशांती मानव सेवाश्रमात ११ विश्वस्तांचे कार्यकारी मंडळ कार्यरत होते. त्यापैकी कालांतराने ५ विश्वस्तांचे निधन झाले, ४ जण इतर ठिकाणी वास्तव्यास गेले, २ विश्वस्तांपैकी एक जण प्रकृती अस्वास्थ्यामुळे कामकाजात सहभागी होऊ शकत नाही, तर दुसरे पांडुरंग ज्ञानदेव कहिले हे मंदिराच्या कामकाज सक्रिय आहेत.

Gold Rate
05 May 2025
Gold 24 KT 93,900/-
Gold 22 KT 87,300/-
Silver/Kg 95,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षस्थानी असलेल्या विश्वनाथ चव्हाण यांच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार गुंडेराव रामाजी मोहोड (वय ६३) हे विश्वनाथ मानव सेवाश्रमाच्या अध्यक्षपदी रुजू झाले. कार्यकारी मंडळाची रीतसर निवडणूक न घेता ही निवड करण्यात आली. स्वयंघोषित अध्यक्ष मोहोड यांनी संस्थेच्या व्यवस्थापकपदी गैरअर्जदार शेषराव रेवतकर यांची नियुक्ती केली. या दोन्ही व्यक्ती संस्थेचे विश्वस्त तसेच सदस्य नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

अध्यक्ष मोहोड हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मंदिराचा निधी मनमर्जीने खर्च करीत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. मंदिरामध्ये आयोजित करण्यात येणारे विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांकरिता लागणाऱ्या वस्तूंकरिता स्वयंघोषित अध्यक्ष मोहोड कोणत्याच निविदा काढत नाहीत. एकदा त्यांनी परस्पर दानपेटी उघडली असता त्यात १३, ५१७ रुपये आढळले. परंतु, ही रक्कम त्यांनी संस्थेच्या खात्यामध्ये जमा केली नाही. ही रक्कम भाविक भक्त आणि दानदात्यांकडून मंदिराला दान करण्यात आली होती. नियमानुसार, ही दानपेटी सर्वांसमोर उघडणे आवश्यक होते. मात्र, अध्यक्षांनी केवळ मर्जीतील व्यक्तींना सोबत घेऊन दानपेटीतील रक्कम अनेकवेळा घरी नेली. या प्रकाराबाबत सचिवांनी विचारणा केली असताना सहकार्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. अध्यक्षांच्या या मनमानीमुळे सचिवांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दानपेटीतील रक्कम मंदिराचे खाते असलेल्या राष्ट्रीय बँकेत जमा करणे आवश्यक आहे. परंतु, मोहोड ही रक्कम ते अध्यक्ष असलेल्या पंतसस्थेत जमा करतात. मंदिराला मिळालेल्या देणग्या आणि विविध कार्यांकरिता विकत घेतलेल्या वस्तूंच्या नोंदीबाबत पारदर्शकता दिसून येत नाही. त्यामुळे या व्यवहाराबाबत संस्थेच्या जमाखाते वहीतदेखील व्यवस्थित नोंद नाही.

राजेश नत्थूजी रहाटे यांनी अध्यक्ष गुंडेराव मोहोड आणि व्यवस्थापक रेवतकर यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहायक धर्मादाय आयुक्त यांनी आदेश दिले की, कार्यकारी मंडळाने संस्थेच्या बँक खात्याचा वापर करावा आणि मंदिराची दानपेटी परस्पर उघडू नये. याशिवाय संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेच्या गैरवापरावर प्रतिबंध घातले आहेत.

एका स्थानिक राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने स्वयंघोषित अध्यक्ष मोहोड आणि व्यवस्थापक रेवतकर हे सहायक धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचे आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमांतील तरतुदींचे उल्लंघन करीत आहेत. राजकीय पाठबळ असल्यामुळेच हे दोघेही निर्ढावले आहेत. याशिवाय ती राजकीय व्यक्ती मंदिराच्या व्यवस्थापकीय कामकाजात ढवळाढवळ करीत असल्याचेही दिसून येते.

Advertisement
Advertisement