मुंबई: अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या हार्वर्ड केनेडी स्कूल आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मंत्रालयातील वॉर रूममधून राज्यातील विकासाबाबत महत्वाच्या बैठका होऊन त्यातून होणाऱ्या महत्त्वपूर्ण निर्णयांची राज्यभर अंमलबजावणी केली जाते.
विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र हे इतर राज्यापेक्षा वेगळे कसे? असा प्रश्न केला. मुख्यमंत्र्यांनी यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबतची माहिती दिली. गेल्या तीन वर्षात इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रातील गुन्हेगारी कमी झाली आहे. शिवाय गुन्हे सिद्धताही वाढली आहे. एखाद्या प्रश्न व समस्येवर त्वरित निर्णय घेण्यात येतो. राज्य सरकारने यासाठी ‘आपले सरकार’ हे वेबपोर्टल आणले आहे. मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून
नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार केले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्यातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. ही योजना इतर राज्यापेक्षा वेगळी असून याची देशपातळीवर दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शेतीविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. सरकारचा सर्वात जास्त भर कृषी व शिक्षण क्षेत्रावर आहे. शेतकऱ्यांना शाश्वत शेती व हमीभाव मिळण्यासाठी सरकारचा भर राहिला आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे.
मुंबईत सर्वात मोठे विमानतळ असल्याने दळणवळण सहज होते. शिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यात विमानतळ होणार आहेत. यामुळे जगाशी संपर्क वाढला आहे. महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी सोयी-सुविधा असल्याने आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही यायला लागले आहेत. मुंबई, नागपूर आणि पुणे या मोठ्या शहरात मेट्रोचे जाळे निर्माण होऊ लागले आहे. शिवाय पाच हजार किमीचे राष्ट्रीय महामार्गांचे कामही प्रगतीपथावर आहे. शिवाय ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’मध्ये मुंबईने सुरू केलेल्या कामांचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षण पद्धतीमध्येही बदल करण्यात येत आहेत. यामध्ये प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा समावेश आहे. प्राथमिकसाठी तीन ग्रेड केले आहेत. याची अंमलबजावणी 50 हजार शाळांमध्ये होत आहे. याचबरोबर शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावरही शासनाचा भर आहे. विद्यापीठ स्तरावर कन्हेंन्शन कोर्सेसवर भर दिला आहे.
