Published On : Fri, Jul 3rd, 2020

विश्वास पाठक भाजपाचे प्रदेश माध्यम प्रमुख

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश प्रवक्ते व विविध विषयांचे अभ्यासू श्री. विश्वास पाठक यांची आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश माध्यम प्रमुख पदी निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषित केलेल्या प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीत ही निवड करण्यात आली.

श्री. विश्वास पाठक हे गेल्या सुमारे 5 वर्षांपासून भाजपाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळीत होते. या दरम्यान त्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी इलेक्ट्रॉनिक चॅनेलच्या माध्यमातून केलेल्या चर्चेतून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची आणि भाजपाची धोरणे आणि भूमिका जनतेसमोर यशस्वीपणे मांडली आहेत.

तसेच प्रिंट मीडियामध्ये अनेक विषयावर लेखन करून त्यांनी आपले स्पष्ट आणि सडेतोड विचार मांडले आहेत. महाराष्ट्र आणि देशातील इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये विविध विषयांवरील अभ्यासू चर्चापटू म्हणून ओळखले जातात.

तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनात त्यांनी ऊर्जा विभागात विविध महत्त्वाच्या जबाबदार्‍या सांभाळल्या आहेत.

पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या काळात त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ऊर्जा विभागाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन बसवले. तसेच 18 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी प्रत्येक जिल्हास्थानी ऊर्जा विभागाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचाव्या म्हणून पत्रपरिषदा घेऊन पत्रकारांशी संवाद साधला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पत्रकारांशी त्यांचा जनसंपर्क आहे.


ऊर्जा विभागापूर्वी नागपूरच्या दैनिक तरुण भारतमध्ये प्रबंध संचालक म्हणून 5 वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये आतापर्यंत 400 वर लेख प्रसिध्द झाले आहेत.

या नियुक्तीबद्दल पाठक यांनी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहे.