नागपूर: नागपुरातील लोकं उत्तम खानपानाचे शौकीन आहेत. त्यांना जिथे ‘हेल्दी आणि क्वालिटी’ फुड मिळेल तेथे ते गर्दी करतात. ‘पोटोबा’ याच संकल्पनेवर आधारीत असल्याने नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही, असे प्रतिपादन नागपुरातील प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केले.
नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती आणि समाजकल्याण विभागाच्या वतीने दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका सिव्हील लाईन कार्यालय परिसरात ‘पोटोबा’ या उपक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, रश्मी धुर्वे, नगरसेविका, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे यांची मंचावर उपस्थिती होती.
उद्घाटक म्हणून बोलताना विष्णू मनोहर पुढे म्हणाले, ‘पोटोबा’च्या माध्यमातून नागपूरच्या खाद्य संस्कृतीमध्ये एक नवा अध्याय सुरू होईल. हेल्दी आणि क्वालिटी फूड देतानाच हा व्यवसाय महिलांच्या आर्थिक प्रगतीशी जोडण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला, ही बाब वाखाणण्याजोगी आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांची ही संकल्पना असल्याने ती नक्कीच उत्तम असेल, यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
महापौर नंदा जिचकार यांनीही या उपक्रमाला शुभेच्छा देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे मनपाने टाकलेले हे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी असे उपक्रम महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून यापुढेही राबविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी प्रास्ताविकातून ‘पोटोबा’ची संकल्पना विषद केली. महिला बचत गटांच्या माध्यमातून ३८ प्रभागात ३८ ‘पोटोबा’ निर्माण करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून महिला बचत गटाची ‘पोटोबा’च्या संचालनाकरिता निवड करण्यात आली. निवड झालेल्या बचत गटाच्या महिलांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले. नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि संतुलित आहार ह्या विशेष बाबी ‘पोटोबा’च्या असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद या संकल्पनेला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी ‘पोटोबा’च्या फलकाचे अनावरण श्री. विष्णू मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महापौर नंदा जिचकार आणि श्री. विष्णू मनोहर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, सदस्या सरीता कावरे, मनिषा अतकरे, खान नसीम बानो मो. इब्राहीम, जिशान मुमताज मो. इरफान अंसारी, वैशाली नारनवरे, नगरसेविका पल्लवी शामकुळे, रुतिका मसराम यांनीही यावेळी उपस्थिती लावून महिला बचत गटाच्या महिलांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मनपातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.