Published On : Thu, Jul 11th, 2019

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी विशाल मुत्तेमवार

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी विशाल विलासराव मुत्तेमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष दुआ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आभार मानले आहे.

यापूर्वी विशाल मुत्तेमवार यांनी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिवपद भूषविले आहे. सध्या ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रसार-प्रसिद्धी समितीचे सदस्य (मीडिया पॅनेलिस्ट) तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चंद्रपूर शहर व जिल्हा प्रभारी आहेत. आज त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि माय करिअर क्लबचे संस्थापक असलेले विशाल मुत्तेमवार हे सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, अमरावतीसह विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार संधी, करिअर कौन्सिलिंग, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षांबाबत अनेक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.