Published On : Sat, Apr 21st, 2018

धंतोली झोनच्या सभापती विशाखा बांते यांचे पदग्रहण

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोनच्या नवनिर्वाचित सभापती विशाखा शरद बांते यांनी शनिवारी (ता. २१) सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. माजी सभापती प्रमोद चिखले यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी धंतोली झोन कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेविका लता काडगाये, स्थायी समितीचे माजी सभापती रमेश सिंगारे, भाजपाचे दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रमेश भंडारी, श्री. भोयर, प्रभू अर्के, श्रीपाद बोरीकर उपस्थित होते.

यावेळी आ. प्रा. अनिल सोले, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी सभापती प्रमोद चिखले यांच्यासह सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती विशाखा बांते यांचा सत्कार केला. याप्रसंगी बोलताना सभापती विशाखा बांते म्हणाल्या, ज्यांच्या विश्वासावर मी निवडून आले त्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. माझ्या कार्यकाळात धंतोली झोनच्या विकासकार्याला एक नवा आयाम मिळेल. यासाठी सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी आणि मुख्य म्हणजे जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. धंतोली झोन भविष्यात ‘आदर्श झोन’ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले, सत्तेचे आणि प्रशासनाच्या कार्याचे विकेंद्रीकरण व्हावे हा झोन निर्मितीमागचा उद्देश होता. सन २००७ पूर्वी मनपा मुख्यालयात प्रचंड गर्दी राहायची. आता झोन निर्मितीमुळे ९० टक्के कामे झोनस्तरावरच होतात. यामुळे मुख्यालयातील अधिकाऱ्यांना शहर नियोजनासाठी वेळ मिळू लागला. यामुळे नवे प्रकल्प आले. झोननिहाय अर्थसंकल्प झाल्यामुळे छोट्या-मोठ्या कामांनाही गती मिळाली. नवनिर्वाचित सभापती विशाखा बांते यांच्या संकल्पनेतील ‘आदर्श झोन’ त्यांच्या कार्यकाळात नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, धंतोली झोनमध्ये मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय नागरिकांचा समावेश आहे. तीन विधानसभा क्षेत्राचा भाग यामध्ये येतो. नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सभापतींनी झोन कार्यालयात एक विशिष्ट वेळ ठेवून जनसामान्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात. त्यामुळे नागरिकांचे समाधान होईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकातून माजी सभापती प्रमोद चिखले यांनी पक्षनेत्यांचे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. नवनिर्वाचित सभापती विशाखा बांते ह्या आपल्यापेक्षाही उत्तम कार्य करतील, असे म्हणत त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी केले. आभार श्रीकांत वैद्य यांनी मानले. कार्यक्रमानंतर सभापतींच्या दालनात सभापती विशाखा बांते यांनी माजी सभापती प्रमोद चिखले यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली.