Published On : Mon, Mar 5th, 2018

स्थायी समिती सभापतीपदी विरेंद्र कुकरेजा यांची बिनविरोध निवड

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी सोमवारी (ता. ५) झालेल्या निवडणुकीत विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांची बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विरेंद्र कुकरेजा यांच्या नावाची घोषणा करीत निवडीबद्दल त्यांचे स्वागत केले.

नागपूर महानगरपालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी विरेंद्र कुकरेजा यांचे चार नामांकन पत्र निगम सचिव हरिश दुबे यांच्याकडे दाखल झाले होते. पहिल्या नामांकनात सूचक नगरसेवक संदीप जाधव तर अनुमोदक नेहा वाघमारे, दुसऱ्या नामांकनात सूचक जयश्री वाडीभस्मे, अनुमोदक नगरसेविका लता काडगाये, तिसऱ्या नामांकनात सूचक नगरसेविका सरला नायक, अनुमोदक नगरसेवक महेश महाजन तर चवथ्या नामांकनात सूचक शेषराव गोतमारे तर अनुमोदक सुनील हिरणवार होते.

यावेळी मावळते सभापती संदीप जाधव, नगरसेविका नेहा वाघमारे, सरला नायक, लता काडगाये, जयश्री वाडीभस्मे, सोनाली कडू, मंगला खेकरे, मनिषा अतकरे, हर्षला साबळे, नगरसेवक मनोज सांगोळे, सुनील हिरणवार, महेश महाजन उपस्थित होते.

स्थायी समिती सभापतीपदासाठी अन्य कोणाचेही नामांकन नसल्यामुळे नगरसेवक विरेंद्र उर्फ विक्की कुकरेजा यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. नवनिर्वाचित सभापती विरेंद्र कुकरेजा हे प्रभाग क्र. १ (ड) मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत.

पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर उपस्थित सदस्यांनीही सभापती विक्की कुकरेजा यांचे स्वागत केले. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, निगम सचिव हरिश दुबे, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा उपस्थित होते.