Published On : Sat, Apr 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नियमांचे उल्लंघन केल्यास वाळू डेपो रद्द!

* राज्यातील सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस
Advertisement

मुंबई: राज्यातील वाळू डेपोंमधील अनियमितता, गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर पवित्रा घेतला असून, राज्यातील सर्व ५७ वाळू डेपोंना नोटीस बजावण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांमार्फत
राज्यातील डेपोंचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तीन दिवसांत मागितला असून , नियमांचे पालन न करणारे डेपो रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासोबतच, नदीच्या वाळूवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळू (एम सॅंड) धोरण लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

डेपो कार्यपद्धतीचा तीन दिवसात अहवाल
वाळू डेपोंमधील गैरप्रकार आणि जनतेच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाळू वाहतुकीसंदर्भातील नियमांचे पालन न करणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव, आणि डेपो मधून प्राप्त होणाऱ्या रेतीमध्ये होणारी टाळाटाळ यांसारख्या तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, सर्व डेपोंच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागीय आयुक्तांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “निकषांनुसार काम न करणारे डेपो रद्द करण्यात येतील. वाळूसंदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष डेपो तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. विशेषतः नागपूरमधील १० डेपोंना नियमांचे उल्लंघन केल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. या डेपोना सात दिवसांत सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही मंत्री बावनकुळे म्हणाले.

पुढच्या मंत्रिमंडळात कृत्रिम वाळूचा प्रस्ताव

राज्य सरकारने नुकतेच रेती निर्गती धोरण लागू केले आहे, ज्यामुळे वाळूच्या व्यवहारांवर कडक नियंत्रण ठेवण्यात येत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून आता कृत्रिम वाळूसाठी (एम सॅंड) स्वतंत्र धोरण आणण्याची तयारी सुरू आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मंजुरीसाठी सादर केले जाईल. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, “प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर उभारून एम सॅंड तयार केले जाईल. यामुळे नदीच्या वाळूची गरज कमी होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल.” या धोरणामुळे बांधकाम क्षेत्राला परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध होईल आणि अवैध वाळू उत्खननाला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.

कोट
“येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी एम सॅंड धोरण आणण्यात येणार आहे. आम्ही प्रत्येक जिल्ह्यात ५० क्रशर आणत आहोत ज्याने एम सॅंड तयार होईल. यामुळे नदीच्या वाळूची गरज राहणार नाही.”
– चंद्रशेखर बावनकुळे
महसूलमंत्री, महाराष्ट्र
______

Advertisement
Advertisement