नागपूर : राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातंर्गत आयोजित गृहपयोगी साहित्य संच वाटप शिबिराला बांधकाम कामगारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. १ एप्रिल पासून सुरू झालेल्या या शिबिरात आतापर्यंत २७ हजार ६३१ नोंदणीकृत कामगारांनी याचा लाभ घेतला आहे.
१५ ते १७ एप्रिल दरम्यान कामठी शहर नगर परिषद क्षेत्रात जुने नगर परिषद, कामठी येथे आणि भिलगाव-रनाळा जिल्हा परिषद व येरखेडा नगर पंचायत क्षेत्रात पंकज मंगल कार्यालय, रनाळा या ठिकाणी या शिबिराचे योग्य आणि नियोजन पद्धतीने आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या शिबिराचा लाभ मिळाला . शिबिरात एकूण ३० गृहपयोगी वस्तूंचे संच दिले आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले . ग्रामीण भागातून येणाऱ्या लाभार्थ्यांना कुठलाही त्रास न होता आपले साहित्य मिळाल्याने लाभार्थ्यांनी पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले .