नागपूर : नवरात्रीच्या उत्साहात परवानगीतील अटी-शर्तींचा भंग करत छत्तरपूर फार्महाऊसवर पहाटेपर्यंत गरबा सुरू ठेवण्यात आला. या प्रकारावरून आयोजक समित अशोक खत्री यांच्याविरोधात मौदा पोलिसांनी कलम १३५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तहसीलदार, कामठी यांच्याकडून कायदेशीर परवानगी घेऊन गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ही परवानगी काटेकोर अटी-शर्तींसह देण्यात आली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. आयोजकांना नियमांचे पालन करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती.
मात्र, २३ सप्टेंबरच्या रात्री १०.१५ वाजता पोलीसांनी कार्यक्रम बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतरही आयोजकांनी काही वेळाने पुन्हा गरबा सुरू केला आणि तो पहाटे २.३० वाजेपर्यंत सुरू ठेवला. यामुळे परवानगी व आदेशाचा उघड भंग झाला.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी इशारा दिला आहे की, परवानगीतील नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई टाळता येणार नाही. नागरिकांनी व आयोजकांनी कायद्याचे पालन करून सण साजरा करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.