मुंबई,दि.२७ : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रह वाचनाचा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार संघानी राबवावा, अशी अपेक्षा मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. यावेळी विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांतील पत्रकारांनी केलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाने काव्य मैफल रंगली.
विधानभवनातील विधिमंडळ पत्रकार कक्षात आज मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ आणि वि.स.पागे प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कुसुमाग्रजांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.तावडे बोलत होते. यावेळी आमदार हेमंत टकले, वि.स.पागे प्रशिक्षण केंद्र संचालक निलेश मदाने, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, श्यामसुंदर सोन्नर महाराज आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचनाचा हा अत्यंत चांगला उपक्रम असून या उपक्रमाचा प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकार संघाने आदर्श घ्यावा, असेही श्री.तावडे यावेळी म्हणाले.
यावेळी विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्य आणि इतर पत्रकारांनी काव्य मैफलीत सहभाग घेतला.
अन् मराठी भाषा मंत्री निवेदक झाले…
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेचे वाचन सुरु असताना मराठी भाषा मंत्री श्री.तावडे यांनी आवर्जुन निवेदकाची भूमिका घेत प्रस्तावनेचे वाचन सुरु केले.