मुंबई : मुंबईतील कमला मिल पाठोपाठ अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव अथवा नगर रचनाकार आणि वास्तुविशारद यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
सदस्य अतुल भातखळकर यांनी मुंबईतील कमला मिलला लागलेल्या आगीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, 1999 मध्ये तयार केलेल्या धोरणानुसार बंद मिलची जागा कन्व्हर्ट करताना एकूण जागेच्या 30 टक्के म्हाडाला, 30 टक्के मुंबई महापालिकेला आणि 30 टक्के गिरणी मालकाला देण्याचे धोरण होते. मात्र त्यात 2001 मध्ये बदल करून नवीन धोरण करण्यात आले आणि एकूण मिलच्या जमिनीऐवजी उपलब्ध मोकळ्या जागेपैकी एक तृतीयांश जमीन वापराबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही गिरण्यांमध्ये गिरणी कामगारांच्या घरासाठी एक इंच जमीनदेखील म्हाडाला मिळाली नाही. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती नेमून चौकशी करण्यात येईल.
ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानासाठी असलेल्या चटईक्षेत्राचा गैरवापर झाला असेल तर तर त्याची चौकशी केली जाईल. याबाबत धोरण तयार करून चटईक्षेत्राचा गैरवापर करणाऱ्या संबंधितांकडून पैसे वसूल केले जातील,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कमला मिलच्या आगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मुंबईतील प्रत्येक उपाहारगृहाचे अग्निसुरक्षेच्या दृष्टीने ऑडिट केले जात आहे,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री आशिष शेलार, सुनील प्रभू, योगेश सागर, वारीस पठाण यांनी भाग घेतला.