Published On : Tue, Mar 19th, 2019

निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व जे. पवित्र कुमार यांच्या मार्गदर्शनात बैठक

Advertisement

निवडणूक खर्चावर राहील बारीक नजर

नागपूर- निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून रामटेक व नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर बारीक नजर ठेवा, अशा सुचना निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनोद कुमार व रामटेक लोकसभा मतदार संघाचे जे. पवित्र कुमार यांनी सुचना दिल्या.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, रामटेक लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह प्रामुख्याने उपस्थित होत्या.

रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची कामे कशी करावी, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत सभागृहात आयोजित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक खर्च नियंत्रक समिती व खर्च नियंत्रक अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. या मर्यादेतच प्रत्येक उमेदवाराने खर्च करणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात व्हीडीओ पथक तैनात करण्यात आले आहेत.

या पथकाद्वारे दररोज अहवाल मागविण्यात येत आहे. उमेदवाराने अतिरिक्त खर्च केल्यास त्यांना स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास त्यांच्या निवडणूक खर्चात हा हिशोब लावण्यात येईल. सदर प्रकरण हे उमेदवार किंवा संबंधीत राजकीय पक्षाचे असल्यास सदर पक्षाला हिशोब विचारण्यात येईल.समाज माध्यम, वृत्तपत्रे, वृत्तवाहिण्या तसेच स्थानिक केबल वाहिण्या यावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आदर्श आचारसंहितेसोबतच निवडणूक काळात उमेदवारांकडून दररोज होणाऱ्या खर्चासंबंधी आढावा घेण्यासाठी आडिओ विडिओ ग्रॉफीची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. त्यासोबतच उमेदवारांना आपल्या खर्चाबाबतचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांकडून प्रचारासाठी विविध माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वृत्तपत्र, सामाजिक माध्यम तसेच दृकश्राव्य माध्यमांवर जाहिरातीच्या तपशीलाची माहिती दररोज घेण्यात यावी व यासबंधीची संपूर्ण माहिती खर्चविषयक नोडल अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे. यासाठी माध्यम प्रमाणिकरण समिती मार्फत विविध राजकीय पक्षांना प्रचार साहित्याबद्दल प्रमाणित करुन देण्यासाठी एमसीएमसीमार्फत नियमित कार्यवाही करण्यात येणार आहे.

निवडणूक काळात दारुची वाहतूक तसेच अवैध वाहतूकीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर विविध पथके तयार करण्यात आली आहे. निवडणूक काळात दारुच्या विक्री संदर्भात उत्पादन शुल्क विभागातर्फे रिटेल दुकानांची नियमित तपासणी करुन उपलब्ध स्टॉक व विक्री यासंदर्भात दररोज मॉनिटरींग करण्याची सूचना खर्च विषयक निवडणूक निरीक्षक यांनी यावेळी दिली.

निवडणूक खर्चविषयक नोडल अधिकारी मोना ठाकूर यांनी निवडूककाळात प्रत्येक उमेदवारांचे खर्चाचा तपशील ठेवण्यात येणार असून नोडल अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा दैनदीन अहवाल सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाबाबत ठेवावयाच्या विविध नोंदीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ अधिकारी व निवडणूक कार्यातील अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.