Published On : Mon, Jun 10th, 2019

गावकर्‍यांच्या समस्या-तक्रारी 15 दिवसात सोडवा : पालकमंत्री

कोदामेंढी-मौदा शहर जनसंवाद कार्यक्रम
कर्जमाफीची प्रकरणे शेतकर्‍यांशी भेटून निकाली काढा
25 गावांच्या हजारो नागरिकांनी केली गर्दी
5 तास पालकमंत्र्यांनी ऐकून घेतल्या अडचणी
मौदा शहराच्या विविध कामांचा आढावा
अनेक तक्रारींवर ऑनस्पॉट निर्णय

नागपूर: जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या गावकर्‍यांच्या प्रशासनिक तक्रारी व समस्या येत्या 15 दिवसात सोडवा. तसेच जनतेशी सौजन्याची वागणूक ठेवा. ज्या तक्रारी त्वरित निराकरण होऊ शकतात त्या त्वरित सोडवा. जनतेला खेटे घालावयास लावू नका, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले.

Advertisement

कोदामेंढी व मौदा शहर जनसंवाद कार्यक्रम शनिवारी दोन्ही ठिकाणी झाला. या जनसंवाद कार्यक्रमात कोंदामेंढी येथे हजारो तक्रारींचा पाऊस पालकमंत्र्यांकडे पडला. एका टोकावर लहानशा असलेल्या या गावात जनतेने प्रचंड गर्दी केली होती. भरउन्हात या जनसंवाद कार्यक्रमात आपल्या लेखी तक्रारी घेऊन महिला, पुरुष हजर झाले होते. पालकमंत्र्यांनी एकूण एका तक्रारीची दखल घेत जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या व संबंधित अधिकार्‍याला जागेवरच निर्देश देऊन तक्रार त्यांच्या ताब्यात दिली. सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. या जनसंवाद कार्यक्रमाला कोदामेंढी येथे जि.प. सदस्य शकुंतला हटवार, अशोक हटवार, माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, मुकेश अग्रवाल, मनोज चवरे, योगेश वाडीभस्मे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात महावितरणच्या समस्या, कर्जमाफी, शेतीला नहराचे पाणी देणे, पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय, कृषी विभाग, वनविभाग, पटवारी कार्यालय, जिल्हा परिषदेशी संबंधित, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाबाबतच्या समस्या नागरिकांनी जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बावनकुळेंसमोर मांडल्या. अनेक तक्रारींवर तर पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांसमोर ऑनस्पॉट निर्णय घेऊन तक्रारकर्त्याला दिलासा दिला.

कोदामेंढीच्या जनसंवाद कार्यक्रमात नांदगाव, बेरडेपार, खंडारा, भांडेवाडी, शिवाडौली, सावंगी, अडेगाव, कथलाबोडी, बोरी, वाघबोडी, धानोली, तोडली, खिड्डी, सुकळी, सिरसोली, वायगाव, पिंपळगाव, मुरमाडी, तांडा, श्रीखंडा, वाकेश्वर, इंदोरा या आजूबाजूला सुमारे 25 गावांतील नागरिकांनी गर्दी केली होती. तक्रारी सोडविण्यासाठी शासनच लोकांच्या दारात पोहोचले आहे. दुर्गम भागात असलेल्या या गावात स्वत: पालकमंत्री 45 तापमान असताना सुमारे 4 ते 5 तास लोकांशी भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेत होते.

मौदा शहराचा जनसंवाद कार्यक्रमातही पालकमंत्री बावनकुळे यांच्याकडे नागरिकांनी समस्यांची शेकडो निवेदने सादर केली. गजानन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सभागृह नागरिकांच्या उपस्थितीने भरले होते. या प्रसंगी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, टेकचंद सावरकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, नगराध्यक्षा भारतीताई सोमनाथे, उपाध्यक्ष शालिनीताई कुहीकर, राजू सोमनाथे, मुन्ना चलसानी, सुनील रोडे, देवाभाऊ कुंभलकर, भीमराव मेश्राम, विमलताई पोटभरे, सुनीता पारशार, राकेश धुर्वे, सुषमाताई कुंभलकर, वैशाली चव्हाण, हरीश जैन, चांगोजी तिजारे आदी उपस्थित होते.

नगरपंचायत मौदा अंतर्गत समस्यांसाठ़ी हा जनसंवाद कार्यक्रम होता. या जनसंवाद कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना, पट्टे वाटप, शहरासाठी मंजूर निधी किती, किती खर्च झाला याचा आढावा, मौदा शहरासाठी प्रस्तावित निधी व त्यातून करावयाची कामे, शहरातील नाले सफाईचा आढावा, नगर पंचायतसाठी जागा मागणीकरिता पाठविलेल्या प्रस्तावांचा आढावा, मौदा शहराच्या विकास आराखड्याची सध्याची स्थिती, प्रस्तावित नगरोत्थान, पाणीपुरवठा योजनांच्या कामात येत असलेल्या अडचणी दूर करणे, या विषयांचा अधिकार्‍यांकडून पालकमंत्री बावनकुळे यांनी आढावा घेतला. याशिवाय नागरिकांनी दिलेल्या समस्यांच्या निवेदनावर त्वरित कारवाई करून 15 दिवसात या समस्या सोडविण्याचे निर्देश नगर पंचायत प्रशासनाला दिले.

Advertisement
Advertisement
Advertisement