Published On : Fri, Aug 31st, 2018

विखे पाटील यांनी घेतली पानसरे कुटुंबियांची भेट

Advertisement

कोल्हापूर: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी सकाळी दिवंगत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रामुख्याने सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने विखे पाटील कोल्हापुरात आले आहेत. यात्रेला प्रारंभ होण्यापूर्वी त्यांनी पानसरे यांच्या निवासस्थानी जाऊन उमाताई पानसरे व मेघा पानसरे यांच्याशी चर्चा केली. सुमारे ३० मिनिटांच्या या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सनातनसारख्या कट्टरवादी संघटनांवर बंदी घालण्यासंदर्भात विचारवंत आणि पुरोगामी चळवळीतील नामवंतांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव निर्माण करण्याची विनंती करण्यासाठी मी पानसरे कुटुंबियांची भेट घेतली.

राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील तरूणांकडे पिस्तुले आणि बॉम्बचे साठे सापडत असताना मुख्यमंत्री निवांत बसले आहेत. या तरूणांची माथी भडकावण्यात आल्याचे स्पष्ट असतानाही त्यामागील सूत्रधारांवर कारवाई करण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसून येत नाही.

राज्यात लहान-सहान घटना घडली तरी त्यावर ट्वीट करून अभिनंदन करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र एटीएसने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या संशयीत मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करण्याचे साधे औदार्य दाखवायला तयार नाहीत. यावरून अशा विचारधारेला त्यांचे पाठबळ असल्याचे स्पष्टपणे जाणवते, असाही ठपका विखे पाटील यांनी यावेळी ठेवला.