नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या ओबीसी प्रमाणपत्रावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांवर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चरण वाघमारे यांनी वडेट्टीवारांनी सुळेंची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला आहे. मात्र, आमच्या पक्षाची भूमिका कधीही जातीय किंवा धार्मिक राजकारण करण्याची राहिलेली नाही, असे चरण वाघमारे यांनी स्पष्ट केले. सुळे यांनी यापूर्वीच या मुद्द्यावर खुलासा केला असून, त्यामुळे वडेट्टीवारांनी एकतर सुळे यांची माफी मागावी किंवा त्यांनी केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ ओबीसी प्रमाणपत्र सादर करावे, असे वाघमारे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीही म्हटले होते. केंद्रातील काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसताना राज्यातील नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्यामुळे अशा समस्या निर्माण होत असल्याचा आरोपही चरण वाघमारे यांनी केला.




