Published On : Sat, Sep 16th, 2023

कॉंग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडेंना जेलमध्ये टाकू!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा इशारा; म्हणाले- सर्वांचे आरक्षण धोक्यात

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरूंगात टाकू आणि चक्की पिसायला लावू, असा इशारा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. क्रांतीभूमी चिमूर येथे आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलतांना त्यांनी राज्यसरकारवर देखील निशाणा साधला. वडेट्टीवार यांनी त्यांच्या भाषणामध्ये अजित पवारांवर टीका केली. तसेच मराठवाड्याच्या मंत्रीमंडळावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, बैठक म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कोण कशासाठी गेलं होतं, हे आम्हाला चांगलचं माहित आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत.

संभाजी भिडेंवर वडेट्टीवारांचा निशाणा
महात्मा गांधी आणि महात्मा फुलेंवर संभाजी भिडे यांनी केलेल्या टीकेवरुन वडेट्टीवारांनी संभाजी भिडेंचा समाचार घेतला. तसेच महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. यावर बोलांताना वडेट्टीवारांनी म्हटलं की, ‘काँग्रेसची सत्ता आली तर संभाजी भिडे यांना तुरुंगात टाकू, त्यांना चक्की फिसायला लावू, असा इशाराच त्यांनी दिला.

Advertisement

महाराष्ट्राचं सरकार तीन रिमोटवर चालतयं
महाराष्ट्राचं सरकार हे तीन रिमोटवर चालत आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, राज्याच्या तिजोरीची सध्या लूट सुरु आहे. फक्त सत्ताधारी आमदारांचाच विकास सुरु आहे. समान्य नागरिक यापासून वंचित राहतोय.

सर्वांची आरक्षण धोक्यात आहेत – वडेट्टीवार
सध्या राज्यभरात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाजाकडून आरक्षणासाठी राज्याच्या विविध भागामध्ये आंदोलनं करण्यात येत आहेत. याच मुद्द्यावर वडेट्टीवार यांनी देखील भाष्य केलंय. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, सर्वांचं आरक्षण हे धोक्यात आलेले आहे. कंत्राटी भरतीच्या कायद्यामुळे सर्वांच्या आरक्षणाचा भविष्य हे अंधारात आहे. त्यामुळे यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन आंदोलनं करा. सरकारचा निषेध करा,पण हा जीआर मागे घ्यायला सांगा.’ ही कंत्राटी भरती आरक्षणाच्या मुळावर उठणार असल्याचा दावा देखील वडेट्टीवार यांनी केलाय. त्यामुळे हा कंत्राटी कायदा रद्द करण्यात यावा अशी आमची भूमिका असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलंय.

लोकसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा
‘लोकसभेच्या निवडणुकांसाठी काही कटकारस्थानं रचली जात असल्याची माहिती आम्हाला दिल्लीतून मिळाली आहे.’ त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सज्ज होण्याचं आवाहन यावेळी वडेट्टीवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तर आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर, गडचिरोलीवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नसल्याचं देखील वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement