मुंबई: जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा जीव गेला होता.
दहशतवाद्यांनी धर्माबाबत विचारून ओळख पटवून पर्यटकांची हत्या केली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना केलेल्या दाव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला.
दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? असा सवाल वडेट्टीवारांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलताना वडेट्टीवारांनी मृत्यूमुखी पडलेल्याच्या कुंटुंबियांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याचे म्हटले.
वडेट्टीवारांचे विधान हे असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करु शकणार नाही. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.