Published On : Thu, Apr 15th, 2021

सतर्कतेतून रोगनिदान आणि निदानातून उपचार शक्य

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये तज्ज्ञांचा सल्ला

नागपूर : कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेमुळे अनेकांचा जीव धोक्यात आलेला आहे. कोव्हिडची प्रत्येक रुग्णाला वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. ताप, सर्दी, कोरडा खोकला, थकवा या सर्वसामान्य लक्षणांसोबतच आता नव्या लक्षणांचीही त्यात भर पडली आहे. हात पाय दुखणे, डायरिया, डोळे लाल होणे, तीव्र डोकेदुखी, चव-गंध नसणे, त्वचेवर ‘रॅशेश’ अशी अनेक लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळणा-या व्यक्तींसह ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे नाहीत अशाही व्यक्ती कोरोनाबाधित आहेत. लक्षणे नसलेले कोरोनाबाधित सर्वाधिक धोकादायक आहेत. त्यामुळे ज्यांना काही लक्षणे आढळतात त्यांच्यासह जे बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत अशांनी चाचणीसाठी पुढे येउन लवकरात लवकर निदान करून घेणे आवश्यक आहे. आजच्या संकटाच्या परिस्थितीत प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. सतर्कतेतून त्वरीत रोगनिदान आणि त्यातून वेळेवर मिळणारे उपचार ही आजची गरज आहे, असा सल्ला प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ तथा आयएमए च्या सहसचिव डॉ. मनीषा राठी व कन्सल्टंट क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. राजेश अटल यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये दिला.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात गुरूवारी (ता.१५) डॉ. मनीषा राठी आणि डॉ.राजेश अटल यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण सुद्धा केले. आज शहरात हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला ही भीती अनेकांसाठी धोकादायक ठरते. त्याच भीतीतून रुग्ण हॉस्पीटलकडे धाव घेतो. त्यामुळे आधी आपल्याला काय लक्षणे आहे याची काळजी घ्या. स्वत:ला ऑपरेट करा. पल्स ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी ९३च्या वर आणि पल्स ६०च्या वर असल्यास रुग्णाला हॉस्पीटलमध्ये जायची गरज नाही. वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी आयएमएशी संलग्नीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. आज प्रत्येकाचा जीव वाचविणे ही सर्व डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी झाली आहे. त्यादृष्टीनेच सर्वच डॉक्टर अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांना सहकार्य करा व आपणही जबाबदारीने वागा. नियमांचे पालन करा. लसीकरणासाठी पुढे या. आज लस हेच कोरोनापासून बचावाचे ब्रम्हास्त्र आहे, असेही डॉ.मनीषा राठी व डॉ.राजेश अटल यांनी सांगितले.

१७ दिवसानंतर चाचणी आवश्यक नाही
पॉझिटिव्ह आल्यानंतर १७ दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर कामावर जाताना चाचणी करण्याची गरज नाही, अशी माहिती डॉ. मनीषा राठी आणि डॉ.राजेश अटल यांनी दिली. कोरोनाबाधित झाल्यानंतर अनेक जण कामावर जाण्यापूर्वी निगेटिव्ह अहवाल मिळावा म्हणून चाचणी करतात. मात्र यामुळे पुन्हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. शासनाच्या दिशानिर्देशानुसार पॉझिटिव्ह रुग्णाचा १७ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. मात्र अनेक कार्यालये कर्मचा-यांना चाचणीचा अहवाल मागवितात, ही चुकीची बाब असून पुन्हा चाचणी करू नये, असेही ते म्हणाले.

याशिवाय सध्या सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीबाबत आक्रोश सुरू आहे. मुळात रेमडेसिवीर इंजेक्शनची प्रत्येकच रुग्णाला गरज नाही. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होईल, अशी स्थिती निर्माण करणा-या संदेशांपासून दूर रहावे. सोशल मीडियावर येणा-या संदेशांचा प्रसार करू नये, असेही आवाहन डॉ.मनीषा राठी व डॉ.राजेश अटल यांनी केले.