– मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा उदंड प्रतिसाद
नागपूर : स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेला मूर्तरूपात साकारण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेप्रति जागरूक होणे आवश्यक आहे. हा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्यावतीने काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शविला.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी ‘स्वच्छ भारत दिवसाचा’ जागर केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीच्या अनुषंगाने २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत परिसरातून रॅलीला सुरूवात झाली व महाल येथील रघुजी राजे भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे रॅलीचे समापन झाले. रॅलीत महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी तसेच उपद्रव शोध पथकाचे जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी या रॅलीला हिरवी झेंडी राखवीली. मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाने बाईक रॅलीचे नेतृत्व केले. बाईक रॅलीमध्ये उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, गणेश राठोड, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अँबेसेडर श्री. कौस्तभ चॅटर्जी, स्वच्छता लीगमध्ये मनपाच्या ‘नागपूर निती’ संघाचे कर्णधार श्री. मेहुल कोसुरकर, सुरभी जैस्वाल यांच्यासह शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
रॅलीच्या सुरुवातीला हिस्लॉप महाविद्यालयाच्या पथकाने स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे पथनाट्य सादर केले. मनपा मुख्यालयातून सुरू झालेली बाईक विधान भवन चौकतुन, मिठानीम दर्गा, गुप्ता हाऊस, हिस्लॉप कॉलेज चौक, भोले पेट्रोल पंप चौक, ट्राफिक पार्क, वानखेडे सभागृह, अलंकार चौक काछीपुरा चौक, लोकमत चौक, धंतोली उद्यान, मेहाडिया चौक, मुंजे चौक, आनंद टॉकीज – रेल्वे अंडर ब्रिज, कॉटन मार्केट चौक, टिळक पुतळा गांधीगेट, चिटणीस पार्क चौक, बडकस चौक या मार्गाने टाऊन हॉल महाल येथे पोहोचली.
चौकाचौकात पथनाट्याचे सादरीकरण
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ भारत दिवसाचे औचित्य साधून स्वच्छ आणि सुंदर नागपूर संकल्पनेसाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅली दरम्यान चौकाचौकात स्वच्छते विषयी पथनाट्य सादर करण्यात आले. चिटणीस पार्क येथे मनपाच्या कपिल नगर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. तर टाऊन हॉल येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कूल, असीनगरच्या विध्यार्थ्यानी पथनाट्य सादर केले.