नागपूर: शहरातील राज नगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवर गेल्या २५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या झोपडपट्टीवासीयांवर बुधवारी सकाळी अचानक अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगलवारी (१५ एप्रिल) झोपडपट्टी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारवाई काही काळासाठी पुढे ढकलण्याचे आश्वासन दिले होते तसेच पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नाही, असेही सांगण्यात आले होते.
मात्र, आश्वासनानंतर अवघ्या काही तासांतच बुधवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. ही कारवाई पूर्णतः अनपेक्षित होती. त्यामुळे नागरिक गोंधळून गेले आणि अनेकांना जबरदस्तीने घराबाहेर काढण्यात आले. अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून, महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आम्हाला सांगितले होते की पर्यायी व्यवस्था करूनच कारवाई होईल. पण कोणतीही पूर्वसूचना न देता आम्हाला रस्त्यावर आणले,असा आरोप एका झोपडपट्टीवासीने केला.
या घटनेनंतर प्रशासनाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवावा की नाही, हा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे. स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध नोंदवला आहे.
या प्रकरणात प्रशासनाची भूमिका आणि आश्वासनांची विश्वासार्हता यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बेघर झालेल्या कुटुंबांसाठी तत्काळ मदत आणि पर्यायी निवारा देण्याची मागणी होत आहे.