Published On : Fri, Jun 25th, 2021

समाजमाध्यमातून हत्येच्या व्हीडीओने शहराच्या प्रतिमेला तडे: अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

Advertisement

‘गुगल’वर हत्या, गुन्हेगारीच्या दोन लाखांवर चित्रफित, कसे येणार गुंतवणूकदार ?

नागपूर: तीन दिवसांपूर्वी योगेश डोंगरे या तरुणाच्या खूनाचा लाईव्ह व्हीडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरला झाला.संपूर्ण राज्यातील नेटकऱ्यांनी हा व्हीडीओ बघितला. नागपुरातील हत्या, गुन्हेगारीचे दोन लाखांवर व्हीडीओ गुगलवर सर्च केल्यास दिसून येत आहे. असे व्हीडीओ अपलोड करणाऱ्यांकडून नकळतच शहराची प्रतिमा मलीन होत असून नव्या कंपन्या, गुंतवणुकदारांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांत शहरात खूनसत्रच होते.

Advertisement

त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांतच धडकी भरली. परंतु शहरातील खून, गुन्हेगारीचे व्हीडीओ आता सोशल मिडिया, इंटरनेटवरही अपलोड होत असल्याने नागपूरबाबत राज्य, देशातही धडकी भरण्याची शक्यता सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केली. इंटरनेटवर गुगलमध्ये काल, २४ जूनला सकाळी ९ वाजता ‘नागपूर मर्डर’ सर्च केल्यानंतर ३३ सेकंदात २ लाख ६६ लाख व्हीडीओंची संख्या असल्याचे पुढे आले. ही संख्या मुंबईपेक्षाही जास्त आहे.

या व्हीडीओमुळे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही नागपूरची ओळख ‘क्राईम सिटी’ म्हणून पुढे येत आहे. याचा परिणाम शहरातील गुंतवणुकीवर होऊन शहरातील रोजगाराच्या निर्माण होणाऱ्या संधीवर ‘ब्रेक’ लागण्याची शक्यताही पारसे यांनी व्यक्त केली. देश-विदेशातील उद्योजक गुंतवणुकीसाठी इंटरनेटवर नागपूर ‘सर्च’ करतात, तेव्हा गुन्ह्याच्या या घटना पुढे येतात.गुन्हेगारीच मोठ्या प्रमाणात दिसत असेल तर कुणीही उद्योजक, गुंतवणूकदार शहरात येणार नाही. त्यामुळे मिहानसह इतर औद्योगिक वसाहतीत निम्‍म्यापेक्षा जागा रिक्त पडून आहेत.

अनेकजण असे व्हीडीओ व्हायरल करतात किंवा इंटरनेटवर टाकून नकळतपणे शहरात गुंतवणुकीच्या संधीच नष्ट करीत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नव्हे या गुन्हेगारीच्या व्हीडीओमुळे शहरातील नागरिकांच्या मनातूही कायद्याची भीती संपुष्टात येत असून शहराच्या व्यवस्थेलाही तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आंतरराष्ट्रीय स्तरावर शहराची प्रतिमा मलिन करणारे असे व्हीडीओ यू ट्यूब तसेच इतर समाज माध्यमावरून काढण्यासाठी पोलिसांनी प्रभावी पाऊले उचलण्याची गरज आहे.खूनाचे किंवा इतर गुन्ह्याचे लाईव्ह व्हीडीओ काढून टाकण्यासाठी यूजरला प्रोत्साहन किंवा कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यास शहराबाबत सकारात्मक वातावारण तयार होऊ शकते. नागरिकांनीही असे व्हीडीओ पसरविण्याऐवजी पोलिस स्टेशनला कळविल्यास चांगले परिणाम पुढे येतील.

– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.

www.ajeetparse.com