Published On : Fri, Apr 5th, 2019

आजी, तुझी लाज वाटते, किरण बेदींच्या नातीचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्या नातीचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेहर भरूचा असे तिचे नाव आहे. या व्हिडीओमध्ये मला डॉ. किरण बेदी यांची नात म्हणायची लाज वाटते, मला तुझ्यासोबत किंवा माझ्या आईसोबत कधीही राहायचे नाही, असे मेहरने म्हटले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणाता व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. किरण बेदी यांनी त्यांची नात मेहर भरूचाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मेहरने ट्विटरच्या माध्यामातून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचे वडील रूझबेह एन भरुचा दिसत आहेत.

“माझे नाव मेहर भरूचा असून माझ्या वडिलांचे रूझबेह एन. भरुचा आहे. मी किरण बेदी यांची एकुलती एक नात आहे. आजी तू माझ्या वडिलांना किंवा त्यांच्या मित्रांना त्रास देण्याचा किंवा घाबरवण्याचा सतत प्रयत्न करतेस. मला कोणीही त्रास देत नाही किंवा माझे अपहरण झालेले नाही. मी माझ्या वडुलांसोबत आहे. मला कोणीही मानसिक, शारीरिक प्रकारचा त्रास देत नाही. तू प्रत्येकवेळी छोट्या छोट्या गोष्टींचा एवढ्या मोठ्या करतेस. मी माझ्या वडिलांसोबत राहायचे आहे आणि मी त्यांच्यासोबत खुप खूश आहे. तसेच मी त्यांच्यासोबत सुरक्षित आहे”, असे तिने सांगितले आहे.

त्याशिवाय या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या आई सायना बेदी यांनाही या माध्यामतून एक संदेश दिला आहे. मी माझ्या वडीलांसोबत खूप सुरक्षित आहे. मला किंवा माझ्या वडिलांना तुझ्यासोबत राहायचे नाही. तसेच आजी किरण बेदी यांच्याविषयी बोलताना तिने म्हटले की, मला किरण बेदी यांची नात म्हणून घ्यायची लाज वाटते. जेव्हा मी माझ्या आजीला माझी आई वडिलांना चप्पलेने मारते असे सांगितले, तेव्हा तिने ही नवरा बायकोमधील भांडण आहे असे सांगून शांत बसण्यास सांगितले. मग आजी आता तु पोलिसांचा वापर का करतेस? असा प्रश्न तिने तिच्या आजीला विचारला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मेहरच्या आई-वडिलांमध्ये वाद सुरु आहेत. मेहरची आई तिच्या वडिलांना मारते, त्यांच्यावर थुंकते, त्यांना मानसिक त्रास देते असे आरोप मेहरने केले आहेत. या सर्व गोष्टीला कंटाळून मेहर तिचे घर सोडून तिच्या वडिलांकडे राहायला गेली होती. त्यानंतर किरण बेदी यांनी मेहरचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली होती. याबाबत आपण सुरक्षित असल्याचा एक व्हिडीओ तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे. तिचा व्हिडीओ चित्रपट दिग्दर्शक दीपिका भारद्वाज यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.