नागपूर: यंदा शहर व जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.या अनुषंगाने शहरातील पाचपावली आणि चीतरओळी भागात इको फ्रेंडली गणेशमूर्ती जास्तीत जास्त संख्येने बनविण्यासाठी कारागीर कामाला लागले आहे.
नागपुरात गणेशोत्सव साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तरित्या येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात गणेशमंडळ आणि स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ही माहिती देण्यात आली व सूचना करण्यात आल्या. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्यासह पोलीस, मनपा व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवा दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण न होता कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी वर्गणीसाठी नागरिकांना जबरदस्ती करु नये, पावसाची स्थिती पाहता गणेश मंडळांनी शॉर्ट सर्कीट होणार नाही याची दक्षता घ्यावी, सीसीटिव्ही लावावेत,आपत्तीजनक देखावे उभारु नये आदी सूचना दिल्या. ‘गणेश विसर्जन’ आणि ‘ईद’ उत्सव हे २८ सप्टेंबर रोजी साजरे होणार आहेत, हे लक्षात घेता सामाजिक सौहार्द राखण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले होते.
गणेशमूर्तीच्या उंचीवर यंदा कोणतेही बंधन नाही –
नागपूर महानगरपालिकेने ( NMC) यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर लावलेली बंधने हटवली आहे. गणेशोत्सवापूर्वी मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.गेल्या वर्षी गणेशमूर्ती घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी महापालिकेने अनुक्रमे २ फूट आणि ४ फूट उंचीची मर्यादा घातली होती. तथापि, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि जलस्रोतांच्या सुरक्षेबाबत गंभीर असलेल्या नागरी संस्थेने सणासुदीच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्तीच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी कायम ठेवली आहे.