नागपूर: दक्षिण-पश्चिम नागपूरच्या सरस्वती विहार कॉलनी आणि गजानन नगर परिसरातील नागरिकांना दिवसाढवळ्या रस्त्यावरून ये-जा करताना मद्यपींचा आणि टवाळखोरांचा त्रास वाढलेला आहे.
जवळच्या दुकानांतून दारु आणि पाण्याच्या बाटलांची खरेदी करून रोज झाडांच्या खाली ‘चिअर्स’ करत बसलेले मद्यपीं पाहायला मिळतात. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे. दारुड्यांसाठी हा मार्ग म्हणजे ‘ओपन बार’ झाला आहे.
सरस्वती विहारमधील मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या कडेला वाहने लावून किंवा उभे राहून नाल्यावर दारू पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. समस्येचा त्रास इतका वाढला आहे की, मद्यपी लोक घराच्या परिसरात जाऊन दारू पिताना दिसतात, त्यामुळे महिलांना या मुख्य रस्त्यावरून फिरणेही अवघड झाले आहे.
टवाळखोर आणि मद्यपींचा उपद्रव वाढला असून, अनेकदा रस्त्यावरच मद्याच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार घडतात. दुपारी आणि सायंकाळच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागते. दारुड्यांचे रस्त्यावर वावर वाढलेला असून, तेथेच लघुशंका करत असतात.
प्रताप नगर पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर त्याला केराची टोपली दाखविण्यात येते. या समस्येवर ठोस उपाययोजना आणि कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. अन्यथा, परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे हा मतदार संघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे.