Published On : Mon, Apr 30th, 2018

विदर्भाच्या बाजूने जनमत घेताच शिवसेनेकडून गोंधळ; नागपुरात कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न

नागपूर: नागपूर शहरात विदर्भवाद्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक आणि शिवसैनिकांनी राडा घातला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत यावेळी शिवसैनिकांकडून खुर्च्या फेकून देत त्यांची मोडतोड करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस नेते विजय दर्डा आणि राज्याचे माजी अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी या गोंधळादरम्यान कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

शहरातील प्रेस क्लबमध्ये ‘स्वतंत्र विदर्भ’ या विषयावर सोमवारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भवादी आणि संयुक्त महाराष्ट्राचे समर्थक आमने-सामने आले. चर्चासत्रादरम्यान, श्रीहरी अणे यांनी जनमत घ्यावे अशी मागणी विदर्भवाद्यांनी केली. त्यामुळे सभागृहात उपस्थितांपैकी विदर्भाच्या बाजूने कोण आहे त्यांनी हात वर करून पाठिंबा द्यावा असे आवाहन अणे यांनी केले. मात्र, या आवाहनानंतर सभागृहात उपस्थित शिवसैनिक आक्रमक झाले आणि दोन्ही गटात वाद झाला.

दरम्यान, शिवसेनेकडून चर्चासत्र उधळून लावण्याचा प्रयत्न करीत दोनदा गोंधळ घालण्यात आला. मात्र, त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. विदर्भवादी नीरज खांदेवला यांचे भाषण सुरू होताच खासदार अडसूळ यांच्यासह शिवसेनेने कार्यक्रमावर बहिष्कार घातला.