Published On : Fri, Sep 13th, 2019

विदर्भातील सर्व शहरे स्वच्छ सर्वेक्षण-2020 साठी सज्ज

Advertisement

नागपूर व अमरावती विभागातील अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

नागपूर: स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात राज्याचे उत्कृष्ट कार्य असून नागपूर व अमरावती विभागातील सर्व शहरे येत्या 2 ऑक्टोंबरपर्यंत हागंदारीमुक्त करण्यात येत असून त्यासंदर्भात लोकसहभाग वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे यांनी केले.

स्वच्छ सर्वेक्षण-2020च्या पूर्व तयारीसाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. गृह निर्माण व नागरी कार्य मंत्रालय, भारत सरकार व स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), नगरविकास विभाग यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-2020 अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वच्छ महाराष्ट्र, मुंबईचे कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, अमरावतीचे संजय निपाने, नागपूरचे अपर आयुक्त राम जोशी, आरोग्य समितीचे सभापती विरेंद्र कुकरेजा, हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सचे सतिश माने, स्वच्छता सर्वेक्षणातील केपीएमजीचे तज्ज्ञ वैभव राय, क्यूसीआयच्या श्रीमती हिमानी वर्मा, प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, प्रशासन अधिकारी हरिश्चंद्र टाकरखेडे, सहाय्यक प्रादेशिक संचालक श्रीमती संघमित्रा ढोके तसेच नागपूर व अमरावती विभागाचे मनपा, नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

स्वच्छ सर्वेक्षण-2020 या कार्यशाळेमध्ये नागपूर व अमरावती विभागातील महानगरपालिकेने स्वच्छता अभियानासाठी केलेले कामगिरीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. स्वच्छता अभियानाची महाराष्ट्रातील वाटचाल व यश, प्लॅस्टिकचा पूर्नवापर कसा करावा, नागरिकांमध्ये उत्साह वाढावा यासाठी स्वच्छता सेल्फी कार्यक्रम राबवावा, प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून ज्यूटच्या किंवा कापडी पिशव्यांसाठी आग्रही असण्याबाबतचे आवाहन कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे यांनी केले.

हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्सचे सतिश माने यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील विविध परिमाण, त्याची गुणवत्ता व दर्जा या बाबत मार्गदर्शन केले. केपीएमजीचे तज्ज्ञ वैभव राय यांनी स्वच्छ सर्वेक्षणातील मुलभूत बाबीं, गुणवत्ता वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, ओडीएफ+, ओडीएफ++, स्टार रेटिंगबाबत मार्गदर्शन केले. क्यूसीआयच्या श्रीमती हिमानी वर्मा यांनी हागंदारीमुक्त शहर, सांडपाणी पुर्नवापर प्रकल्प, पर्यावरणपूरक गणेश उत्सव, निर्माल्यापासून खत निर्मिती, कचऱ्याचे वर्गीकरण व प्रतवारीनुसार विभागणी करुन पुर्नवापर आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत उपस्थितांना तज्ज्ञांना प्रश्न विचारुन त्यांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रश्नोत्तरी तास ठेवण्यात आला होता. यावेळी नोडल अधिकारी, शहर समन्वयक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वच्छता सर्वेक्षण अभियानाचे प्रास्ताविक करताना प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर यांनी सविस्तर माहिती दिली. 2 ऑक्टोंबर 2014 पासून स्वच्छ सर्वेक्षण अभियान देशात लागू झाले आहे. देशात शहरे हागंदारीमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर राहीला आहे. येत्या 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत राज्यातील संपूर्ण शहरे ओडीएफमुक्त करावयाची आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला गती मिळावी म्हणून याला स्पर्धेचे स्वरुप देण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण-2020 अभियान स्पर्धेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 500 कोटी रुपयांचे बक्षिस जाहिर केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यशाळेचे संचालन गोंदियाचे जिल्हा प्रशासन अधिकारी विनोद जाधव यांनी तर आभार सहाय्यक प्रादेशिक संचालक श्रीमती संघमित्रा ढोके यांनी मानले.