विदर्भाच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष दयावे; विदर्भातील आमदारांची मागणी

नागपूर : दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होते तेव्हा विदर्भातील जनता विविध समस्या व शेतकरी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्याकरता येत असतात. त्यांचे हे प्रश्न टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले असा आरोप काँग्रेसचे गोंदियातील आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार विरेंद्र जगताप, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ , भाजपाचे आमदार आशिष देशमुख, समीर मेघे यांनी विधानभवनाच्या परिसरात केला.

४ जुलैपासून अधिवेशन सुरू झाले या दोन आठवड्याच्या कामकाजात विदर्भाच्या एकाही मुद्यावर यात चर्चा झाली नाही. केवळ कोकणातील नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर सत्ताधारी गोंधळ घालून हे अधिवेशन पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. कर्जमाफी, बोंडअळीग्रस्तांना मदत, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळे आता अधिवेशनाचा शेवडचा आठवडा शिल्लक राहिला असून, सोमवार पासून सुरू होत असलेल्या कामकाजात केवळ विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने त्वरीत लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.