Published On : Thu, Jul 19th, 2018

विदर्भाचे प्रश्‍न सुटत नसतील तर नागपुरात अधिवेशन घेण्याची गरज काय – विजय वडेट्टीवार

नागपूर : विदर्भातील प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेत पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेतला. हे अधिवेशन सुरू होऊन तेरा दिवस झाले. या तेरा दिवसात केवळ विदर्भाबाहेरील प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले. विदर्भाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून या सरकारने विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली. जर अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील प्रश्न सुटत नसतील तर नागपुरात हिवाळी असो वा पावसाळी अधिवेशन घेण्याची गरज काय असा प्रश्न कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केला.

सध्या नागपुरात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून उद्या शेवटचा दिवस असणार आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने विदर्भातील प्रश्न सुटावेत आणि अनुशेष भरून काढण्यासाठी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन आठवड्यांचे कामकाज निश्चित करण्यात आले. या तीन आठवड्यांमध्ये केवळ तेरा दिवसांचे कामकाज पार पडले.

त्यातही दोन दिवस हे विदर्भाच्या संबंधात नसलेल्या नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून वाया गेले आणि एक दिवस हा पाण्यात गेला. त्यामुळे उरलेल्या शेवटच्या आठवड्यात हे सरकार विदर्भाच्या प्रश्‍नांना प्राधान्य देतील अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली होती.

उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून, आज 9 लक्ष लक्षवेधी सभागृहात मांडण्यात आल्या पण दुःखाची बाब म्हणजे यात विदर्भाच्या एकाही प्रश्नावर चर्चा करण्यात आली नाही. विदर्भातील अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.

शेती पिकाच्या नुकसानभरपाचा प्रश्न अजून पर्यंत सुटलेलं नाही आम्हाला अपेक्षा होती की हे सगळे प्रश्न निकाली लागतील मात्र हे सरकार विदर्भाच्या बाबतीत गंभीर नसून या सरकारने विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. जर अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाचे प्रश्न सुटत नसतील तर नागपुरात हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन घेण्याची गरजच काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.