Published On : Mon, Mar 19th, 2018

पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा : विरेंद्र कुकरेजा


नागपूर: गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटपाचे काम रखडले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारीत जितक्या झोपडपट्टी आहेत, त्याचा सामाजिक-आर्थिक आणि प्लेन टेबल सर्वेक्षण लवकरात लवकर करून पट्टेवाटपाची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश स्थायी समितीचे सभापती तथा नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त विरेंद्र कुकरेजा यांनी नासुप्र अधिकाऱ्यांना दिले.

नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नागपूर शहरातील झोपडपट्टी पट्टे वाटपसंबंधी सध्या काय स्थिती आहे यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. बैठकीला स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांच्यासह महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. मिलिंद माने, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपाचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, नासुप्रचे महाव्यवस्थापक अजय रामटेके, अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, नासुप्रचे श्री. भांडारकर, इटकेलवार, मनपाचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, नगरसेवक बाल्या बोरकर, दिलीप चौधरी, स्वयंसेवी संस्थेच्या लिना बुधे उपस्थित होते.

सभापती विरेंद्र कुकरेजा पुढे म्हणाले, जोपर्यंत नागपूर सुधार प्रन्यास उर्वरीत कामे पूर्ण करणार नाही, आर.एल.चे वाटप वेगाने करणार नाही, तोपर्यंत ते बरखास्त होणार नाही, हे अधिकाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. पट्टेवाटपाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे किमान यापुढे सर्वेक्षणासाठी एक नवी एजंसी टाकून त्या कामाला वेग देण्यात यावा. यासाठी एक स्वतंत्र सेल बनवून स्वतंत्रपणे हे कार्य पूर्ण करावे, असे निर्देश दिले.

नागपूर सुधार प्रन्यासद्वारे नागपूर शहरातील झोपडपट्टी पट्टे वाटपसंबंधी सध्या काय स्थिती आहे, किती ले-आऊटमध्ये पट्टे वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली व किती शिल्लक अहे, गुंठेवारी मध्ये नागपूर सुधार प्रन्यासकडे अभिन्यासाची व भूखंडांची किती प्रकरणे प्रलंबित आहे किंवा त्यास मंजुरी देण्यात आली आहे अथवा नाही या संपूर्ण बाबींची माहिती बैठकीत घेण्यात आली.

आमदार डॉ. मिलिंद माने यांनी उत्तर नागपूरमधील झोपडपट्टीची स्थिती सांगत नासुप्र बरखास्त होणार आहे म्हणून विकास कामांनाही ब्रेक लागला असल्याचे सांगितले. काही ठिकाणची रस्त्यांची कामेही रखडली असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. आमदार कृष्णा खोपडे यांनी सर्वेक्षणामध्ये होत असलेल्या दिरंगाईची बाब लक्षात आणून दिली. ज्या एजंसीकडे सर्वेक्षणाचे कार्य आहे, त्या एजंसीचा पाठपुरावा तातडीने करण्यात यावा. ज्या झोपडपट्टींच्या सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण झाले आहे, किमान त्या झोपडपट्ट्यांमध्‍ये पट्टे वाटपाचे काम तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले. आमदार सुधाकर देशमुख यांनीही नासुप्रला उर्वरीत विकासकामे तातडीने करण्यात यावे, असे निर्देश दिले.

महापौर नंदा जिचकार यांनीही नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना झोपडपट्टी पट्टे वाटप कामातील सर्व अडथळे एकत्र येऊन दूर करण्याचे निर्देश दिले.

नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसकर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती देताना सांगितले की, झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणासाठी तीन ते चार वेळा निविदा काढण्यात आल्या. मात्र कुठलीही एजंसी समोर आली नाही. एका निविदा प्रक्रियेत जी एकमेव एजंसी आली त्या एजंसीच्या माध्यमातून काम सुरू आहे, ज्याचा वेग अत्यंत कमी आहे. जर दुसरी कुठली एजंसी यायला तयार असेल तर त्या एजंसीलाही काम देऊन कामाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न आहे. सर्वेक्षण पूर्ण झाले की दोन दिवसांत पट्टे वाटपाचे कार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी दिला. आर. एल. वाटपाचे काम कुठेही थांबले नाही. एका वर्षात २६ हजार आर. एल. वाटप करण्यात आले आहे. जे काम थांबले आहे, ती प्रकरणे अडचणीचे आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील पाच हजार घरांचे बांधकाम प्रगतीपथावर असून २ ऑक्टोबर रोजी त्याचे लोकार्पण होईल, ही माहितीही डॉ. म्हैसकर यांनी यावेळी दिली.