नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवार घोषित करण्यात आले असून, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून राधाकृष्णन यांना समर्थन द्यावे, अशी विनंती केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “या निवडणुकीत आम्हाला तुमचाही पाठिंबा आवश्यक आहे,” असे फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना सांगितल्याचे समजते. मात्र, काँग्रेसकडील नेत्यांशी त्यांनी संपर्क साधल्याचे वृत्त नाही.
इंडिया आघाडी एकजुटीने मैदानात-
दुसरीकडे, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार घोषित करत आज संसद भवनात अर्ज दाखल केला. या वेळी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी नेते उपस्थित होते.
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की, “ही लढत संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. सुदर्शन रेड्डी हे लोकशाही मूल्यांना न्याय देतील, याबाबत आम्ही खात्री बाळगतो.”
यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांनीही एनडीएऐवजी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या फोन कॉल्समुळे मात्र महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलाच ऊत आला आहे.