Published On : Tue, Jun 15th, 2021

आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी व्हेंटिलेटर्स मंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

Advertisement

नागपूर:- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 11 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोरोना साथीच्या काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची उपलब्धता असावी. साधन सामुग्रीअभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यासाठी 11 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आज या व्हेंटिलेटर्सचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात पार पडले. जिल्हा शल्य चिकित्सकांकडे हे व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भात दुसरी कोरोना लाट ओसरत आली असली तरी तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानुसार व्हेंटिलेटर्स उपलब्ध व्हावे यासाठी पुर्व विदर्भात 30 व्हेंटिलेटर्सचे वाटप करण्यात आल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.