सॅनिटायझर आणि मास्कचेही केले वाटप
नागपूर : भारतीय संस्कृतीत महिलांसाठी महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा. यंदाची वटपौर्णिमा कोव्हिड-१९ च्या सावटात आल्यामुळे आणि लॉकडाऊनचा पगडा असला तरी महिलांनी नियमांचे पालन करीत हा सण उत्साहाने साजरा केला. नागपूरच्या उपमहापौर मनीषा कोठे यांनी सर्व निर्देशाचे पालन करीत वटपूजा करून आदर्श पायंडा घालून दिला.
उपमहापौर मनीषा कोठे यांनी पूर्व नागपुरातील त्यांच्या प्रभागातील महिलांसह हा सण साजरा केला. इतर महिलांसह त्यांनी वडाच्या झाडाची पूजा केली. मात्र हे करताना त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे पुरेपूर पालन केले. अन्य महिलांनाही सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व समजावून सांगितले.
पूजेनंतर त्यांनी तेथे आलेल्या अन्य महिलांना हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप केले. लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता दिली असली तरी आपली दैनंदिन कामे करताना शासनाने दिलेले निर्देश पाळणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने यापुढे नियमित सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी जाताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना सांगितले.