
नागपूर : ट्युशन क्लासला ने-आण करणाऱ्या व्हॅनचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील बोलणे आणि छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी लीलाधर मनसाराम समर्थ (३७, रा. नागपूर) याला पालकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वानाडोंगरी आणि हिंगणा परिसरातील काही विद्यार्थिनी रविनगर येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये नीट (NEET) परीक्षेची तयारी करतात. त्या विद्यार्थिनींना क्लासला आणणे-नेणे याची जबाबदारी आरोपी लीलाधरकडे होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याचे वर्तन संशयास्पद झाले होते. तो विद्यार्थिनींशी असभ्य शब्दांत बोलू लागला आणि अश्लील टिप्पणी करत होता.
या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनींनी त्याचे बोलणे मोबाईलवर गुपचूप रेकॉर्ड केले. शुक्रवारी त्याने पुन्हा अभद्र भाषा वापरल्याने मुलींनी संपूर्ण संभाषण पुराव्यादाखल आपल्या पालकांना दाखवले.
प्रकरण उघड होताच पालकांनी आरोपीला भेटायला बोलावले आणि जबाब मागितला. मात्र त्याच्या निष्काळजी आणि उर्मट उत्तरांमुळे संतप्त पालकांनी त्याला पकडून हिंगणा पोलिस स्टेशनमध्ये सुपूर्द केले.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे, आरोपीकडून चौकशी सुरू आहे. विद्यार्थिनींचे जबाब नोंदवले जात आहेत. मोबाईलमधील पुरावे तपासल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.










