
नागपूर : ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव’च्या “जागर भक्तीचा” या अध्यात्मिक उपक्रमांतर्गत सोमवारी सकाळी झालेल्या शिव महिम्न स्तोत्र पठणाने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्रांगण भक्तिरसाने भारावले.
भगवान शिवाच्या महिमेचे वर्णन करणाऱ्या या स्तोत्र पठणात शेकडो महिला आणि पुरुष भक्त एकसुरात सामील झाले. कण्वाश्रमाच्या भगिनींच्या सुरात मिसळत संपूर्ण परिसरात ‘ॐ नमः शिवाय’चा नाद गुंजत राहिला. पठणानंतर झालेल्या शिवशंकराच्या आरतीने कार्यक्रमाला भक्तिभावाचा उत्कर्षबिंदू लाभला.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन कांचनताई गडकरी, रजनी दीदी (प्रजापिता ब्रह्मकुमारी), स्मिता केळकर (रामनगर शक्तिपीठ), माई खांडेकर, शिल्पाताई जोग (देवी अहल्या मंदिर), तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले आणि डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी रजनी दीदी म्हणाल्या, “आज या सामूहिक स्तोत्र पठणामुळे वातावरणात दिव्य ऊर्जा निर्माण झाली आहे. शिवस्वरूप परमात्म्याची अनुभूती प्रत्यक्ष जाणवली.” त्यांनी श्री. नितीन गडकरी आणि सौ. कांचनताई गडकरी यांच्या अध्यात्मिक उपक्रमासाठी कृतज्ञता व्यक्त केली.
रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन करताना माहिती दिली की, “शिव महिम्न स्तोत्र हे संस्कृत भाषेतील प्रमुख स्तोत्र असून गंधर्व पुष्पदंताने त्याची रचना केली आहे. यात एकूण ४३ श्लोक असून ३१ श्लोक हे शिवस्तुतीवर आधारित आहेत. या स्तोत्राचे पठण वाणीला संस्कार देते, शब्दशुद्धी निर्माण करते आणि मनाला शांतता मिळवून देते.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दर्शना नखाते, सुजाता खंबाटा, सुजाता काथोटे आणि श्रीरंग वऱ्हाडपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.‘जागर भक्तीचा’ या मालिकेतील हा कार्यक्रम नागपूरच्या अध्यात्मिक वातावरणात भक्तिभाव आणि संस्कारांची नवी लाट निर्माण करणारा ठरला.










