Published On : Thu, May 6th, 2021

४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांचे गुरुवारी लसीकरण सुरळीत होणार

Advertisement

– १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी अतिरिक्त ३ केन्द्र सुरु

नागपूर : नागपूर शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहराकरीता राज्य शासनाचे कोटयातून लसीचा साठा प्राप्त झाल्यामुळे शहरातील ४५ वर्षावरील नागरिकांचे सुविधेकरीता एकूण ९६ केन्द्रांवर लसीकरण करण्यात येईल. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) येथे तीन केंद्रावर कोव्हॅक्सीन, इंदीरागांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे २ केंद्र व अ.भा. आर्युविज्ञान संस्था (AIMS) मध्ये ४ येथे कोव्हिशिल्ड याप्रमाणे मनपा व शासकीय मिळून ९६ केंद्रावर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल.

तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तिसाठी अतिरिक्त ३ केन्द्र सुरु करण्यात आले असून यामध्ये कोव्हेक्सीन लसीकरण स्व.प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केन्द्र, छाप्रु सर्वोदय मंडळ हॉल छाप्रुनगर सेंट्रल एव्हेन्यू व मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC) या ठिकाणी करण्यात येईल. त्याशिवाय पाचपावली सुतिकागृह रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर व आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा येथे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात येईल.

१८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मनपाद्वारे निर्धारित इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, पाचपावली सूतिकागृह व आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा या तीन केंद्रांवर सुरू राहिल. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.