Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Tue, May 21st, 2019

पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करा – अश्विन मुदगल

नागपूरला मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा

नागपूर: ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविताना पाण्याचा अपव्यय होणार नाही. याची खबरदारी घेताना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

नागपूर शहराला नवेगाव खैरी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत असून तोतलाडोह या प्रकल्पाच्या मृत पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा करण्याला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पात 15 जुलैपर्यंत पुरेल एवढा मृत जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचे दररोज 1.26 दलघमी पाणी तोतलाडोह प्रकल्पातून सोडण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिली.

पिण्याचे पाणी वापरताना महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच अवैधपणे मुख्य जलवाहिनीवरुन पाणी उचलणाऱ्या विरुद्ध तसेच टिल्लूपंप वापरणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम राबवावी, असेही यावेळी बैठकीत सांगितले. नवेगाव खैरी प्रकल्पातून दररोज 750 दलघमी पाणी शहराला पुरविण्यात येते. कळमेश्वर, कोराडी तसेच खापा आदी नगरपालिकांना सुद्धा या प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

अंबाझरी जलाशयातून वाडी नगरपालिकेला पिण्याचे पाणी पुरविण्याला सुरुवात झाली असून पाणीपुरवठा करताना निर्जंतुकीकरण व जलशुद्धीकरण करुनच पिण्याचे पाणी पुरवावे, अशी सूचना करताना पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी स्वच्छ पाणी न वापरता सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने उपलब्ध करुन द्यावे. अशी सूचना यावेळी करण्यात आली.

35 गावांना 48 टँकरद्वारे पाणीपुरवठा
ग्रामीण भागातील पाणीटंचाईसाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात 1 हजार 530 उपाययोजना सुरु करण्यात आल्या असून यासाठी 28 कोटी 80 लक्ष रुपये विविध विभागांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे व गाळ काढणे तसेच खाजगी विहिरींच्या अधिग्रहणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

कामठी, हिंगणा व नागपूर ग्रामीण या तीन तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या 35 गावांना 48 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये कामठी तालुक्यातील चार गावांना 9 टँकर, हिंगणा तालुक्यातील 20 गावांना 12 टँकर तर नागपूर ग्रामीण तालुक्यातील 11 गावांना 27 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नगरपालिका तसेच नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना 39 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये काटोल नगरपालिकेतर्फे 4 टँकर, वाडी नगरपालिकेतर्फे 8, वानाडोंगरी- 6, कन्हानपिंपरी व बुटीबोरी प्रत्येकी 4, पारशिवनी, हिंगणा प्रत्येकी 3 तर कळमेश्वर, सावनेर, भिवापूर, महादुला, कन्हान पिंपरी, रामटेक, मोहपा नगरपरिषदेतर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाई आराखड्यानुसार मंजूर करण्यात आलेल्या नवीन विंधन विहिरी, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे तसेच गाळ काढणे आणि विंधन विहिरींच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत गवळी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गंधे, कार्यकारी अभियंता तुरखेडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टाकळीकर तसेच नगरपालिकांचे कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145