नागपूर – केंद्र सरकारच्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईवर काँग्रेसकडून सातत्याने टीका होत आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धरामय्या यांच्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एक वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
वडेट्टीवार म्हणाले, “पाकिस्तानकडून अवघ्या पाच हजार रुपये किमतीचे ड्रोन पाठवले गेले, आणि त्यांना निष्क्रिय करण्यासाठी आपण पंधरा पंधरा लाखांच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी पक्षांनीही काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे.
वडेट्टीवारांच्या या विधानामुळे भारतीय लष्कराच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र स्पष्टीकरण देण्यात येत आहे की, वडेट्टीवारांचा उद्देश सरकारच्या खर्चाच्या अनिर्बंध धोरणावर लक्ष वेधण्याचा होता.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमावर्ती भागात भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन घुसखोरीला आक्रमक प्रत्युत्तर दिले होते. या कारवाईत अनेक संशयित ठिकाणांवर निशाणा साधण्यात आला होता.