
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार आपला निकाल आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in येथे पाहू शकतात.
या निकालानुसार, 2,736 उमेदवारांनी पुढील टप्पा व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) यासाठी पात्रता मिळवली आहे. मात्र, न्यायालयीन कारणास्तव तीन उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत. आयोग लवकरच मुलाखतींचे वेळापत्रक आणि संबंधित सूचना जाहीर करणार आहे.
आयोगाच्या माहितीनुसार, जे उमेदवार यशस्वी झाले आहेत, त्यांना ई-समन्स लेटर मिळण्यासाठी आपली माहिती ऑनलाइन पडताळणे आवश्यक आहे. ज्यांनी आधीच आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांनी देखील लॉग इन करून तपशीलांची पुष्टी करणे आवश्यक आहे.
मुलाखतीसाठी उमेदवारांनी सोबत आणावयाची कागदपत्रे-
शैक्षणिक पात्रतेचे पुरावे, जात आणि आरक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र, तसेच अपंगत्वाशी संबंधित (PwBD) कागदपत्रे. याशिवाय आयोगाने नमूद केलेले प्रवास भत्ता (TA) फॉर्म देखील आवश्यक आहे.
UPSC ने स्पष्ट केले आहे की निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत गुणपत्रिका संकेतस्थळावर पाहता येतील. उमेदवारांनी त्या डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.










