नागपूर: नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने १४ आणि १५ मे रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यासाठी हवामान विभागाने विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. विशेषतः गडचिरोली, यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना याचा अधिक फटका बसू शकतो.
मे महिन्यात पावसाचे सावट-
सामान्यतः मे महिन्यात विदर्भात उष्ण वारे वाहत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून वार्यांची दिशा बदलली असून वेगही वाढला आहे. त्यामुळे हवामानात आर्द्रता वाढून पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून विदर्भात मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह हवामानात बदल दिसून येत आहे.
तापमानात घट-
मे महिन्यात विदर्भात तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअसदरम्यान राहते. मात्र यंदा वातावरणात मोठे परिवर्तन दिसून येत आहे. विदर्भात ढगाळ हवामान असल्यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सध्या तापमान सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशांनी खाली आले आहे, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुढील दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा-
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, बुधवारी आणि गुरुवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.