नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन व मंथन व्यासपीठ यांच्या वतीने शुक्रवार, दि. ३० मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. व्हीआयपी रोडवरील वनामती सभागृहात सायंकाळी ६ वाजता हा सोहळा होईल.
याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख श्री. सुनीलजी आंबेकर व ज्येष्ठ संपादक तथा विचारक श्री. विवेकजी घळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. पुस्तकाचे लेखक ना. श्री. गडकरी हेही यावेळी उपस्थित असतील.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. भारतात आणि जगातही अनेक ठिकाणी देशकार्य आणि समाजोन्नतीचे असंख्य प्रकल्प यशस्वीपणे राबविणाऱ्या या संघटनेचे मनुष्यबळ व्यवस्थापन हा सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. ‘संघातील मानवी व्यवस्थापन’ या पुस्तकातून ना. श्री. गडकरी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाबाबत एक स्वयंसेवक म्हणून मांडणी केली आहे. या कार्यक्रमाला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजहंस प्रकाशन तथा मंथन व्यासपीठ यांच्या वतीने श्री. नरेश सबजीवाले यांनी केले आहे.