Published On : Thu, Jun 17th, 2021

बुटीबोरी येथील नवीन उड्डाणपुल होणार अपघात रहीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत बुटीबोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण संपन्न.

Advertisement

नागपूर – हिंगणा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नाअंती आणि हायकोर्ट कडून स्थगिती उठवल्या नंतर बुटीबोरी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. १०० लोकांचे अपघाती निधन येथे होवूनही जागा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जात होती . पण आता आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थापत्येचा उत्तम मेळ साधून या महत्वकांक्षी उड्डाणपुलाचे काम झालेले आहे. येथून पुढे बुटीबोरी उड्डानपुल अपघात रहीत होणार असून येथे जीवितहानी होणार नसल्याचा विश्वास केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.या पुलामुळे वर्धा, चंद्रपूर, हैद्राबाद कडे जाणारी वाहतूक सुरळीत आणि जलद होईल.पुलाचे डिजाइन हे अतिशय उत्तम असून शहरातील इतर पुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्कृष्ट आहे.नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वरील बुटीबोरी इथल्या ७० कोटी निधीतून,१.६९ किमी लांबीच्या उड्डाणपुलाचे, रजवाडा हॉल, बुटीबोरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले ‘ त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते.

बुटीबोरी उड्डाणपुलाखाली लॅडस्केपिंग करून अतिक्रमणाची समस्या आताच सोडविणे गरजेचे असून बुटीबोरी मधील स्थानिक चित्रकारांकडूनच पुलाच्या पेटिंगचे काम झाले पाहिजे आणि या करिता खादी ग्रामोद्योग निर्मित गोबर ( शेणापासून बनवलेल्या ) नैसर्गिक पेंटचा वापर केला पाहिजे अशी सूचना त्यांनी यावेळी केली .

बुटीबोरी नगरपरिषद ही आदर्श नगरपरिषद बनायला हवी आणि त्या करीता गाव दत्तक योजनेप्रमणे मी बुटीबोरी नगरपरिषद दत्तक घेत असल्याची घोषणाही त्यांनी केली .

बुटीबोरी मधे CNG प्लॅन्ट बनलेला असून या मार्फत प्रदूषणाची समस्या कमी होण्यात मदत होईल तसेच येथील ध्वनी,पाणी, हवा प्रदुषणाचा डाटा एकत्रित करून ग्रीन नागपूर साठी प्रयत्नशील राहू , असे आश्वासन गडकरींनी दिले . येथील रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था उत्तम झाली पाहिजे. नागपूर बुटीबोरी हा ४पदरी रस्ता येत्या ६ महिन्यात ६ पदरी बनवून तसेच पुढील ६ महिन्यात नागपूर-बुटीबोरी मेट्रोचे काम सुरु करून टाकळघाट पर्यंत नेण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही त्यानी दिली.

बुटीबोरी ओद्योगिक क्षेत्रातील प्रदुषण लक्षात घेता आणि
येथील मुबलक झाडे लक्षात घेता यांची संख्या ५ पटीने वाढायला हवी आणि उंची ३ मी. पर्यंत हवी. उच्च दर्जाचे शिक्षण देणारी शाळा, कॉलेजेस बुटीबोरीत निर्माण व्हावे. तसेच NHAI च्या सहाय्याने महामार्गालगत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनयुक्त, आधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा देणारे खाजगी दवाखाने, आरोग्यकेंद्रे निर्माण होतील यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास त्यांनी दर्शविला.

नागनदीला २ ,२०० कोटीचा खर्च करून तिच्या स्वच्छतेचा आणि संवर्धनाचा शुभारंभ झालेला असून येणाऱ्या काळात अंबाझरी तलावासमवेत जलपर्यटन आणि वॉटर स्टेशन्स उभारू याची खात्री त्यांनी दिली. स्थानिक आर्किटेक्चर कडून बुटीबोरी विकासाचा प्लॅन बनवून फूड मॉल, पार्किंग, उद्याने, करमणूक यासाठी उपाययोजना बनवता येतील. तसेच खेळासाठी उत्तम मैदाने, स्टेडियम, बगीचे तयार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.